कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भावबंधन की भाऊबंदकी? काय होणार?

06:55 AM Jun 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

महाराष्ट्राच्या राजकारणात मुंबई महानगरपालिका निवडणुका नेहमीच केंद्रस्थानी असते. ही निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची नसून, राज्यातील राजकीय सत्तासमिकरणे ठरवणारी आणि अनेक पक्षांच्या भवितव्यासाठी निर्णायक ठरणारी आहे. त्यातही ती दोन शिवसेना आणि एक मनसेचे भवितव्य सर्वात आधी ठरवेल.  2025 मध्ये होऊ घातलेल्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील संभाव्य युतीच्या चर्चा जोर धरत असताना, अचानक राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यापूर्वीही या स्तंभात दोन भाऊ एकत्र यावेत असे अनेकांचे मन सांगत असले तरी मेंदू सांगत नाही हे स्पष्ट केले होते. भाजपने ते खरे करून दाखवले आहे.

Advertisement

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील संभाव्य युतीच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहेत. ठाकरेसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांचा पाया मराठी अस्मिता आणि प्रादेशिक अभिमान यावर आधारित आहे. 2006 मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून मनसे स्थापन केल्यानंतर, दोन्ही पक्षांमध्ये तीव्र वैर निर्माण झाले. अनेकवेळा दोन्ही भाऊ एकत्र येता येता राहिले. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांना अनपेक्षित धक्का बसला. खुद्द अमित ठाकरे यांचा पराभव झाला. त्यासाठी शिंदेसेनेच्या सदा सरवणकर यांच्या उमेदवारीचा हट्ट कारणीभूत ठरला. त्यामुळे मुंबई मनपा निवडणुकीची चाहूल लागल्याच्या टप्प्यावर राज ठाकरे यांनीही एका पॉडकास्टमध्ये वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी उद्धव यांच्यासोबत येण्याची इच्छा व्यक्त केली. तर ठाकरे यांनी पुन्हा इतरांशी चर्चा, जेवणावळी करायच्या नाहीत अशी अट घालून एकत्र येण्याची तयारी दर्शवली. ही विधाने केवळ भावनिक आवाहन नसून, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी रणनीतीचा भाग असल्याचे दिसले. पण दोन भाऊ तरीही एकत्र येतील याची खात्री नव्हती. नातेवाईक, कार्यकर्ते मात्र आनंद व्यक्त करत राहिले. मुंबईत मराठी मतदारांचा मोठा वाटा आहे, आणि दोन्ही ठाकरे यांची एकत्रित ताकद महायुतीसाठी, विशेषत: भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी, मोठी आव्हान ठरू शकते.

Advertisement

फडणवीस-राज भेट: भाजपचा डावपेच?

या युतीच्या चर्चा जोरात असतानाच, 12 जून रोजी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मुंबईतील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये झालेल्या भेटीने सगळ्यांचे लक्ष वेधले. ही भेट सुमारे एक तास चालली, आणि यामुळे उद्धव-राज युतीच्या शक्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. भाजपने ही भेट ‘विकासाच्या मुद्यांवरील चर्चा’ असल्याचे सांगितले असले, तरी राजकीय विश्लेषक याला भाजपचा मास्टरस्ट्रोक मानत आहेत. ज्यामुळे दोन भावातील चर्चेला खीळ बसली. विशेष म्हणजे बैठकीतही राज ठाकरे सर्वात आधी उपस्थित होते म्हणतात.

भाजपसाठी मुंबई महापालिका निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ शिवसेनेने या पालिकेवर वर्चस्व राखले आहे. मात्र, 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर आणि उद्धव ठाकरे सत्तेबाहेर गेल्यानंतर, भाजपला ही संधी साधायची आहे. राज ठाकरे यांची मनसे, जरी विधानसभेत कमकुवत असली, तरी मुंबईतील मराठी मतदारांवर त्यांचा प्रभाव आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राज यांनी भाजपला पाठिंबा दिला होता, आणि आता फडणवीस यांच्या भेटीमुळे मनसे महापालिकेतही भाजपसोबत युती करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पण या धोरणाचा मनसेला फायदा कमी आणि दीर्घकालीन तोटा अधिक होऊ शकतो. राज यांना एकीकडे यशस्वी होण्याची आणि दुसरीकडे आपला आब राखण्याची कसरत करायची आहे. याउलट उद्धव यांनाही आपली सत्ता कायम ठेवायची आहे. पण, भाजपचा कट्टर विरोधक ही आपली प्रतिमादेखील सोडायची नाही.

फडणवीस यांनी यापूर्वी उद्धव-राज युतीच्या चर्चांवर ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना’ अशी टिप्पणी करत स्वत:ला तटस्थ ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, राज यांच्याशी थेट भेट घेऊन त्यांनी ठाकरे बंधूंची युती रोखण्याचा आणि मनसेला महायुतीत सामील करण्याचा डाव टाकला असावा. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या रणनीतीला धक्का बसू शकतो. कारण राज यांनी जर भाजपसोबत हातमिळवणी केली, तर मराठी मतदारांचे विभाजन होऊन ठाकरेसेनेला सेनाला नुकसान होऊ शकते.

या सगळ्या राजकीय खेळाचा निष्कर्ष काय निघू शकतो? पहिल्यांदा, राज ठाकरे यांच्यासमोरील पर्यायांचा विचार करता, मनसे गेल्या काही वर्षांत कमकुवत झाली आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत अमित ठाकरेंना फटका आणि जेमतेम यश मिळाले. अशा परिस्थितीत, राज यांच्यासमोर स्वत:चा राजकीय वारसा आणि पक्षाची प्रतिष्ठा टिकवण्याचे आव्हान आहे. उद्धव यांच्यासोबत युती केल्यास मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा जोर धरू शकतो, पण यामुळे मनसेला स्वतंत्र ओळख मिळेल याची खात्री नाही. दुसरीकडे, भाजपसोबत युती केल्यास राज यांना विधान परिषदेची जागा किंवा इतर राजकीय लाभ मिळू शकतात, पण यामुळे त्यांची ‘मराठी मसीहा’ ही प्रतिमा धूसर होण्याचा धोका आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही परिस्थिती कसोटीची आहे. ठाकरेसेनाला मुंबई महापालिका राखण्यासाठी मराठी मतदारांचे एकत्रीकरण आवश्यक आहे. जर राज यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला, तर उद्धव यांना महाविकास आघाडीतील सहकाऱ्यांवर अधिक अवलंबून राहावे लागेल, जे मुंबईच्या स्थानिक राजकारणात तितके प्रभावी नाहीत. फडणवीस यांच्यासाठी ही भेट एक चाल आहे. त्यांनी ठाकरे बंधूंची युती रोखण्याचा प्रयत्न केला आहे, आणि यशस्वी झाल्यास भाजपला मुंबईत सत्ता मिळवण्याची संधी आहे. मात्र, जर ऐनवेळी राज यांनी उद्धव यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला, तर महायुतीला, विशेषत: भाजपला मोठा धक्का बसेल. शिंदेंची धावपळ उडेल. तसाही मनसे भाजप तंबूत आला तरी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या अस्वस्थतेत भर पडेल. राज हे उद्धव यांच्यासोबत जातील की भाजपच्या छावणीत राहतील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. एकूणच, हा राजकीय डावपेचांचा खेळ आहे, ज्यामध्ये मराठी अस्मिता, सत्ता आणि राजकीय वारसा यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्ष करत आहे.

येत्या काही महिन्यांत या चर्चांचा निष्कर्ष काय निघतो, हे महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवेल. याहूनही विशेष म्हणजे भाजप 150 जागा लढविणार असे जर थेट म्हणत असेल तर राज ठाकरे, एकनाथ शिंदे, अजित पवार, रामदास आठवले यांच्या वाट्याला किती जागा येणार? 60 पेक्षा अधिक माजी नगरसेवक जे शिंदे सेनेत गेलेत त्यांचे काय? हा कळीचा व डाव मोडणारा मुद्दा उरतोच!

शिवराज काटकर

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article