नर्मदापुरम मतदारसंघात भावाच्या विरोधात भाऊ
एक भाजपचा तर दुसरा काँग्रेसचा उमेदवार
मध्यप्रदेशातील नर्मदापुरम मतदारसंघातील लढत सर्वात लक्षवेधी ठरली आहे. येथी भाजप आणि काँग्रेसच्या तिकिटावर दोन्ही भाऊ आमनेसामने निवडणूक लढवत आहेत. परस्परांच्या विरोधत निवडणूक लढण्याचा प्रकार आमच्यावर थोपण्यात आल्याचा दावा करत दोन्ही भाऊ परस्परांच्या पक्षाला जबाबदार ठरवत आहेत.
चारवेळा आमदार राहिलेले भाजपचे उमेदवार सीताशरण शर्मा हे विधानसभा अध्यक्ष देखील राहिले आहेत. मागील निवडणुकीत त्यांनी 15 हजार मतांनी विजय मिळविला होता. परंतु यावेळी त्यांच्यासमोर त्यांचेच ज्येष्ठ बंधू गिरिजाशंकर शर्मा यांनी आव्हान उभे पेले आहे. ही लढत होणे टाळायला हवी होती, परंतु ही लढत विचारसरणींमधील असल्याचे सीताशरण शर्मा यांनी म्हटले आहे. सीताशरण शर्मा यांच्या विरोधात काँग्रेसने त्यांचेच बंधू गिरिजाशंकर (भाजपचे माजी आमदार) यांना मैदानात उतरविले आहे. भावाविरोधात निवडणूक लढण्याची वेळ येऊ नये असे वाटत होते, परंतु याकरता भाजप जबाबदार असल्याचा दावा गिरिजाशंकर यांनी केला आहे. नर्मदेच्या काठावर वसलेल्या या मतदारसंघात ब्राह्मण समुदायाचे प्रमाण अधिक आहे. याचमुळे येथे बहुतांशकरून ब्राह्मण नेताच निवडून आला आहे. मागील 25 वर्षांपासून येथे शर्मा कुटुंबाचे सदस्यच आमदार झाले आहेत.
अपक्ष उमेदवारही मैदानात
या मतदारसंघात अपक्ष उमेदवारही उभे आहेत. येथे लढत चुरशीची होणार असली तरीही सीताशरण शर्मा हे स्वत:च्या सक्रियतेमुळे विजय गाठतील, अशी राजकीय जाणकारांचे मानणे आहे.