राकेश-शीतल देवीला कांस्य
वृत्तसंस्था/ पॅरिस
भारताचा पॅराबॅडमिंटनपटू सुहास यतिराजला पुरुषांच्या एसएल 4 प्रकारातील अंतिम लढतीत पराभव स्वीकारावा लागल्याने त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. भारताचे हे एकूण 12 वे तर पॅरा बॅडमिंटनमधील चौथे पदक आहे. याशिवाय मिश्र सांघिक तिरंदाजीमध्ये भारताच्या राकेश कुमार व शीतल देवी यांनी कांस्यपदक पटकावले.
अंतिम लढतीत यतिराजला फ्रान्सच्या लुकास माझुरकडून 0-2 (9-21, 13-21) असा पराभव स्वीकारावा लागला. टोकियो पॅरालिम्पिकमध्येही त्याने रौप्य मिळविले होते. विशेष म्हणजे त्यावेळीही त्याला माझुरकडूनच पराभव स्वीकारावा लागला होता. 41 वर्षीय सुहास हा 2007 बॅचचा आयएएफ ऑफिसर असून अंतिम लढतीत त्याच्याकडून अपेक्षित कामगिरी झाली नाही. त्याच्या डाव्या घोट्याला व्यंग असून यामुळे त्याच्या हालचालीवर परिणाम होतो.
मिश्र सांघिक कंपाऊंड तिरंदाजीमध्ये राकेश कुमार व शीतल देवी यांनी कांस्यपदकासाठी झालेल्या प्लेऑफ लढतीत इटलीच्या मॅटेव बोनासिना व इलेओनोरा सार्ती यांचा अतिशय चुरशीच्या लढतीत 156-155 अशा गुणांनी रोमांचक विजय मिळवित पदक निश्चित केले. भारताचे हे एकूण 13 वे तर सहावे कांस्यपदक आहे.