महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारतीय हॉकी संघाला कांस्य

07:10 AM Aug 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये तिसरे स्थान : गोलरक्षक पीआर श्रीजेशला पदकाने निरोप

Advertisement

वृत्तसंस्था/पॅरिस
Advertisement

भारताच्या पुरुष हॉकी संघाने सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिक कांस्यपदक पटकावताना स्पेनचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव करून गोलरक्षक पीआर श्रीजेशला पदकाची भेट देत निरोप दिला. टोकियो ऑलिम्पिकमध्येही भारताने कांस्यपदक मिळविले होते. 52 वर्षांत प्रथमच भारताने सलग दोन कांस्य जिंकण्याचा पराक्रम केला. स्पेनने प्रथम आघाडी घेतली असली तरी नंतर भारताने आधी बरोबरी केली आणि मग एका गोलची आघाडीही घेतली. अखेरच्या काही क्षणात मात्र स्पेनने जोरदार चढाया करीत भारताची चिंता वाढवली होती. शेवटच्या मिनिटाला त्यांनी दोन कॉर्नर्स मिळविले, पण भारताने भक्कम बचाव करीत दडपण झुगारून देत कांस्यपदकावर शिक्कामोर्तब केले. 41 वर्षांच्या खंडानंतर भारताने टोकियोत

ऑलिम्पिक पदक मिळविले होते. येथील स्पर्धेआधी भारताला परिपूर्ण बिल्डअप मिळाले नव्हते. तरीही त्यांनी शानदार प्रदर्शन करीत मागील आवृत्तीची पुनरावृत्ती केली. यापूर्वी 1968 व 1972 मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये भारताने सलग कांस्यपदके मिळविली होती. भारताला आजवर सहावेळा चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते, त्यामुळे पॅरिसमधील पदकाची भारतीय चाहत्यांना मोठी प्रतीक्षा लागली होती. विनेश फोगाटच्या अपात्रतेमुळे पसरलेली निराशा या पदकामुळे थोडीफार कमी झाली, असे म्हणता येईल. स्पेनचा एकमेव गोल कर्णधार मार्क मिरालेसने 18 व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकवर नोंदवला तर कर्णधार हरमनप्रीत सिंगने 30 व 33 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर भारताचे दोन्ही गोल नोंदवले. उपांत्य सामन्यात जर्मनीकडून 2-3 असा निसटता पराभव झाल्याने आलेली मरगळही या पदकामुळे दूर झाली आहे.

भारताच्या हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकत यंदाच्या ऑलिम्पिकमधील भारताला चौथ पदक मिळवून दिले आहे. भारताने कांस्यपदकाच्या सामन्यात स्पेनचा 2-1 अशा फरकाने पराभव केला. विशेष म्हणजे, हॉकीमध्ये भारताचे हे आजवरचे एकूण 13 वे पदक ठरलं आहे. ऑलिंपिकच्या इतिहासात भारताने आतापर्यंत हॉकीत 8 सुवर्ण, 1 रौप्य आणि 4 कांस्यपदके मिळवली आहेत. टोकियो ऑलिम्पिकमध्येही भारताने कांस्यपदक जिंकले होते आणि आता सलग दुसऱ्यांदा पोडियमवर स्थान मिळवण्यात संघाला यश आले आहे. भारताचा अनुभवी गोलरक्षक पीआर श्रीजेशचा हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता आणि संघाने या दिग्गज खेळाडूला यादगार निरोप दिला.

यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सुवर्णपदकाचा दुष्काळ संपवेल अशी तमाम भारतीयांना आशा होती. पण, उपांत्य फेरीत जर्मनीने शानदार विजय मिळवत भारताला सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाहेर केले. यामुळे गुरुवारी कांस्यपदकासाठी भारत व स्पेन यांच्यात सामना झाला. पहिल्या सत्रामध्ये दोन्ही संघ एकमेकांना कडवी टक्कर देताना दिसले. मात्र यामध्ये एकही गोल होऊ शकला नाही. दुसऱ्या सत्रात मात्र स्पेनने बाजी मारली. स्पेनसाठी मार्क मिरालेसने 18 व्या मिनिटाला गोल केला, मात्र, स्पेनचा आनंद फार काळ टिकला नाही. दुसरे सत्र संपण्यास अवघ्या 48 सेकंदाचा अवधी उरला असताना भारतीय कर्णधार हरमनप्रीतने शानदार गोल करत भारताला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. तिसऱ्या सत्रामध्ये टीम इंडिया खूपच आक्रमक दिसली.

पीआर श्रीजेशला खेळाडूंचा कुर्निसात

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाने चौथे पदक जिंकले आहे. गुरुवारी भारतीय हॉकी संघाची ब्राँझपदकासाठी स्पेनशी लढत झाली. ज्यामध्ये संघाने 2-1 असा विजय नोंदवला. या विजयानंतर भारतीय संघाने जोरदार जल्लोष केला. भारतीय गोलरक्षक श्रीजेशच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हा शेवटचा सामनाही होता. श्रीजेशने ऑलिम्पिक सुरु होण्यापूर्वीच ही स्पर्धा शेवटची असल्याचं जाहीर केले होते. या विजयानंतर अखेरचा सामना खेळलेला श्रीजेश उत्साही दिसत होता. त्याने गोलपोस्टवर चढाई केली. भारताच्या विजयानंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक क्रेग फुल्टन यांनीही हा विजय साधेपणाने साजरा करण्यास सांगितले. यानंतर भारतीय संघ श्रीजेशकडे धावला. त्यांनी श्रीजेशला मानवंदना दिली. यानंतर  भारतीय संघाचा कर्णधार हरमनप्रीतने श्रीजेशला खांद्यावर उचलत मैदानात फेरी मारली.भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले! ऑलिम्पिकमधील त्यांचे हे सलग दुसरे पदक आहे. त्यांचे यश कौशल्य, चिकाटी आणि सांघिक भावनेचा हा विजय आहे. खेळाडूंचे अभिनंदन. प्रत्येक भारतीयाचा हॉकीशी भावनिक संबंध आहे आणि ही कामगिरी आपल्या देशातील तरुणांमध्ये हा खेळ अधिक लोकप्रिय करेल, असा विश्वासही पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.

हरमनप्रीतची धमाकेदार कामगिरी

टीम इंडियाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 8 सामन्यात 10 गोल केले. भारतासाठी हरमनप्रीतने उपांत्यपूर्व, उपांत्य फेरीत आणि कांस्य पदकाच्या लढतीत गोल करत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले. हरमनप्रीत सिंह हा पंजाबमधील अमृतसरच्या जंडियाला भागातील तिम्मोवाल गावातील शेतकरी कुटुंबातील आहे. हरमनप्रीतला 2015 मध्ये भारताच्या वरिष्ठ हॉकी संघात संधी मिळाली होती. यानंतर आतापर्यंत त्याने टीम इंडियाच्या प्रत्येक विजयात मोलाचे योगदान दिले आहे.

ऑलिम्पिकमधील भारतीय संघाची कामगिरी

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने चमकदार कामगिरी केली. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा 3-2 असा पराभव केला होता. पुढचा सामना अर्जेंटिनाबरोबर अनिर्णित राहिला. तिसऱ्या सामन्यात भारताने आयर्लंडचा 2-0 असा पराभव केला पण बेल्जियमविरुद्ध भारताला पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय नोंदवला होता. भारताने ऑस्ट्रेलियाला 3-2 अशी पराभवाची धूळ चारली. त्यानंतर भारताने ग्रेट ब्रिटेनचा पराभव केला. उपांत्य फेरीत भारताला जर्मनीविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article