तुटलेला तुकडा अन् अपघाताचा छडा
अपघातात तरुण ठार : हिट अॅण्ड रन प्रकरणी ट्रकचालकाला दोन तासांत अटक
प्रतिनिधी/ बेळगाव
हिट अॅण्ड रन प्रकरणातील वाहनाचा केवळ दोन तासांत शोध लावून वाहनचालकाला अटक करण्यात आली आहे. हिरेबागेवाडी पोलिसांनी शनिवारी ही कारवाई केली आहे. अपघातानंतर पलायन करणाऱ्या वाहनचालकाचा केवळ दोन तासांत शोध घेणाऱ्या अधिकारी व पोलिसांचे आयुक्तांनी कौतुक केले असून प्रमाणपत्र देऊन गौरव केला आहे. भरधाव ट्रकच्या ठोकरीने उमेश देशनूरकर (वय 30) हा युवक जागीच ठार झाला. शनिवार दि. 14 जून रोजी दुपारी 1.09 वाजता पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर हिरेबागेवाडी येथील एचपी पेट्रोलपंपजवळ ही घटना घडली होती. अपघातानंतर ट्रकचालकाने आपल्या वाहनासह पलायन केले होते.
घटनेची माहिती समजताच हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक सुंदरेश होळेन्नावर, हवालदार सुभाष शिंगण्णावर, पोलीस एस. बी. बाबन्नावर, सीएआरचे सी. बी. कोटगी व कित्तूरचे हवालदार जी. सी. कुरी आदींनी फरारी ट्रकचालकाचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
घटनास्थळी ट्रकचा एक तुकडा पडला होता. सीसीटीव्ही फुटेजवरून व घटनास्थळी आढळलेला तुटलेला तुकडा हातात घेऊन हिट अॅण्ड रन प्रकरणातील वाहनाचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली. जेएच 05 डीएस 9944 क्रमांकाची अशोक लेलँड ट्रक अंबडगट्टी क्रॉसजवळ दिसली. कित्तूरच्या हवालदाराने ट्रक अडवून चालक हमीदखान रुकमुद्दीन (वय 32) राहणार हातील, ता. पालवल, हरियाणा याला ताब्यात घेतले. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी हिरेबागेवाडी व कित्तूर पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक केले आहे.