For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Vari Pandharichi 2025: पांडुरंगाची आस, भीमा नदीवर पूल बांधणारा विठ्ठलभक्त इंग्रज होता तरी कोण?

11:16 AM Jun 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
vari pandharichi 2025  पांडुरंगाची आस  भीमा नदीवर पूल बांधणारा विठ्ठलभक्त इंग्रज होता तरी कोण
Advertisement

स्कॉटसाहेबाने पाठविलेलं पत्र उजेडात आले असून त्यांच्या विठ्ठल प्रेमाची ओळख होते.

Advertisement

By: मानसिंगराव कुमठेकर

सांगली : पंढरपूर येथे दरवर्षी जमणाऱ्या लाखो वारकऱ्यांना सोयीचा ठरणारा भीमा नदीचा पूल एका विठ्ठलभक्त ब्रिटीश अधिकाऱ्याच्या प्रयत्नामुळे शंभर वर्षापूर्वी झाला. जी. स्कॉट असं या अधिकाऱ्याचं नाव असून त्याने या पुलाच्या बांधकामाच्या मदतीसाठी 1894 मध्ये भक्तांना पत्राद्वारे भावनिक आवाहन केले होते. स्कॉटसाहेबाने पाठविलेलं हे पत्र उजेडात आले आहे. या पत्रातून त्यांच्या विठ्ठल प्रेमाची ओळख होते. मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या कुमठेकर संग्रहात हे पत्र आहे.

Advertisement

भीमा नदीवर उभारलेला जुना पूल हा पंढरपूर मधील नागरिकांसाठीच नव्हे, तर दरवर्षी पंढपूरमध्ये भरणाऱ्या चार यात्रांसाठी येणाऱ्या लाखो वारकऱ्यांना वरदान ठरला आहे. या पुलामुळे दरवर्षी पावसाळ्यात येणाऱ्या आषाढी यात्रेतील भक्तांसाठी उपयुक्त आहे. मात्र, वारकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या या पुलाचा उभारणीमागे जी. स्कॉट या विठ्ठलभक्त ब्रिटीश अधिकाऱ्याचे परिश्रम कारणीभूत आहेत.

पावसाळ्यात लाखोंच्या संख्येने येणाऱ्या विठ्ठलभक्तांचे होणारे हाल त्याला पाहावले नाहीत. त्यामुळे त्याने भीमा नदीवर पूल बांधला जावा, अशी आग्रही भूमिका घेतली. त्यासाठी तत्कालीन सरकारकडून पूल बांधकामाचा निम्मा खर्च मागून घेतला. आणि उर्वरीत खर्चासाठी देशभरातील भक्तांना मदतीचे आवाहन केले.

तत्कालीन पंढरपूर नगरपालिकेचे प्रेसिडेंट असणाऱ्या स्कॉट साहेबांनी सन 1894 मध्ये भक्तांना पाठविलेल्या पत्रातून त्यांची विठ्ठलभक्ती आणि त्यांचा संतसाहित्यावरचा अभ्यास याची प्रचिती येते. हे पत्र मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या कुमठेकर संग्रहात आहे. सन 1894 मध्ये पाठविलेल्या पत्रातून जी. स्कॉट यांनी भक्तांना पूल बांधकामासाठी मदत करण्याचे आवाहन करताना बांधकामाची आवश्यकता पटवून दिली आहे.

या पुलासाठी सहा लाख रुपये खर्च येणार असून त्यापैकी काही रक्कम सरकार देणार आहे, तर उर्वरीत रक्कम भक्तांनी पांडुरंगाच्या या सेवेसाठी द्यावी, असे म्हटले आहे. जे लोक देणगी देता त्यांची नावे पंढरपूरच्या मंदिरात कायमस्वरूपी स्वतंत्र पुस्तकरूपाने कायम राहतील. तसेच देणगीदारांची नावे वर्तमानपत्रातही प्रसिद्ध करण्यात येतील, असे स्कॉट यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

पुलाच्या बांधकामाचे काम आपल्याच कारकीर्दीत आल्यामुळे देवाची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळाली असल्याची भावना स्कॉट यांनी व्यक्त केली होती. जी. स्कॉट साहेबांच्या प्रयत्नाने पुढे लवकरच भीमा नदीवर पूल बांधला गेला. लाखो वारकऱ्यांची सोय झाली. मात्र, या पुलाच्या उभारणी मागे जी. स्कॉट या विठ्ठलभक्त ब्रिटीश अधिकाऱ्याचे योगदान होते हे विसरता कामा नये.

Advertisement
Tags :

.