ब्रिटनच्या खासदाराचा भारतावर गंभीर आरोप
भारतीय एजंट्सच्या हिटलिस्टमध्ये अनेक ब्रिटिश-शीख
वृत्तसंस्था/ लंडन
भारतीय एजंट्स ब्रिटनमध्ये राहत असलेल्या शीखांना लक्ष्य करत असल्याचा आरोप तेथील शीखधर्मीय खासदार प्रीत कौर गिल यांनी केला आहे. गिल यांनी ब्रिटिश संसदेचे कनिष्ठ सभागृह (हाउस ऑफ कॉमन्स)मध्ये शिखांवरील कथित अत्याचाराचा मुद्दा उपस्थित केला. ब्रिटनमध्ये राहणारे शीख ही भारताशी संबंधित एजंट्सच्या हिटलिस्टमध्ये असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
गिल यांनी विदेशात शिखांच्या विरोधातील कथित हत्येच्या कटांचा उल्लेख केला. तसेच ब्रिटिश शिखांच्या सुरक्षेसाठी ब्रिटनचे सरकार कोणती पावले उचलत आहे अशी विचारणा त्यांनी केली आहे.
अलिकडच्या काळात फाइव्ह आईज देशांनी (ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, अमेरिका आणि ब्रिटन) युनायटेड किंगडममध्ये शीख कार्यकर्त्यांना लक्ष्य करणाऱ्या भारताशी संबंधित एजंट्सच्या कारवाईवर चिंता व्यक्त केली आहे. कथित हत्या आणि हत्येचे कट हाणून पाडण्यात आले आहेत. अमेरिका आणि कॅनडाने अशा प्रकरणांना स्वत:चे सार्वभौमत्व आणि स्वत:च्या लोकशाही मूल्यांसाठी आव्हान मानले आहे. तसेच यासंबंधी जाहीरपणे भूमिका मांडली आहे. ब्रिटिश शिखांनाही अशाप्रकारचा धोका असल्याचे वृत्त पाहता सरकार त्यांच्या सुरक्षेसाठी कोणती पावले उचलत आहे असा प्रश्न गिल यांनी सुनक सरकारला विचारला आहे.
खासदार गिल यांच्या प्रश्नाला सुरक्षामंत्री टॉम तुगेनधाट यांनी उत्तर दिले आहे. जर कुठल्याही अन्य देशाकडून ब्रिटिश नागरिकाला कोणत्याही प्रकारचा धोका असेल तर आम्ही त्वरित कारवाई करणार आहोत. शीख समुदायाला ब्रिटनमध्ये अन्य समुदायांप्रमाणे सुरक्षित राहण्याचा अधिकार आहे. सर्व ब्रिटिश नागरिक समान आहेत, असे तुगेनघाट यांनी म्हटले आहे.