ब्रिटनचे अब्जाधीश माइक लिंच यांचा मृतदेह हस्तगत
मुलीचा अद्याप लागला नाही शोध
वृत्तसंस्था/ सिसली
ब्रिटनचे दिग्गज अब्जाधीश माइक लिंच यांचा मृतदेह याटच्या अवशेषांमधून गुरुवारी प्राप्त झाला आहे. हे याट इटलीच्या सिसली किनाऱ्यावर सोमवारी आलेल्या वादळात बुडाले होते. माइक लिंच यांची कन्या हन्नाह अद्याप बेपत्ता असल्याचे इटलीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 56 मीटर लांब याद द बेयसियन पोर्टिसेलोनजीक उभी असताना अचानक वादळ आल्याचे सांगण्यात आले. माइक लिंच यांना ब्रिटनचे बिल गेट्स असे संबोधिले जात होते. लिंच यांची अलिकडेच अमेरिकेतील एका खटल्यातून निर्दोष मुक्तता झाली होती.
संबंधित याटमध्ये 10 जणांचा चालक दल आणि 12 प्रवासी होते. दुर्घटनेनंतर लिंच यांची पत्नी एंजेला बकारेस आणि अन्य 14 जणांना वाचविण्यात आले होते. आतापर्यंत 6 जणांचे मृतदेह हस्तगत झाले आहेत.
लिंच यांच्या मुलीला शोधण्यास काही वेळ लागू शकतो. कारण दुर्घटनेवेळी याट अत्यंत खोल समुद्रात उभी होती. या दुर्घटनेसंबंधी न्यायालयीन चौकशी केली जाणार आहे. या चौकशीचे नेतृत्व एम्ब्रोगियो कार्टोसिया करणार असून लवकरच ते पत्रकार परिषदेद्वारे माहिती देतील असे अग्निशमन विभागाचे प्रवक्ते लुका कैरी यांनी सांगितले आहे.