ब्रिटनचे राजे चार्ल्स यांना कर्करोग
राजघराण्यातून बाहेर पडलेले प्रिन्स हॅरी घेणार भेट
वृत्तसंस्था/ लंडन
ब्रिटनचे राजे चार्ल्स यांना कर्करोग झाला असल्याची माहिती बकिंगहॅम पॅलेसने दिली आहे. किंग चार्ल्स यांचे सर्व कार्यक्रम सध्या काही काळासाठी टाळण्यात आले आहेत. किंग चार्ल्स हे स्वत:च्या उपचारांवरून अत्यंत सकारात्मक असल्याचे पॅलेसकडून सांगण्यात आले.
75 वर्षीय किंग चार्ल्स हे मागील महिन्यात तीन दिवस रुग्णालयात दाखल होते. त्यांच्यावर तेथे शस्त्रक्रियाही झाली होती. त्याचवेळी त्यांच्या शरीरात अन्य आजाराची लक्षणे दिसून आली होती. त्या लक्षणांच्या तपासणीदरम्यान एक प्रकारच्या कर्करोगाची पुष्टी झाली असल्याचे पॅलेसकडून सांगण्यात आले.
किंग चार्ल्स तृतीय हे लवकर बरे व्हावेत आणि त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी मी सर्व देशवासीयांसोबत प्रार्थना करतो असे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवरील पोस्टमध्ये नमूद पेले आहे.
किंग चार्ल्स यांच्यावर सोमवारपासून उपचार सुरू झाले आहेत. त्यांचे सार्वजनिक कार्यक्रम काही काळासाठी टाळण्यात आले असले तरीही ते हेड ऑफ स्टेट म्हणून स्वत:ची भूमिका पार पाडणार आहेत. तसेच स्वत:च्या सर्व प्रायव्हेट मीटिंग्स जारी ठेवणार आहेत. किंग चार्ल्स यांनी स्वत:चे दोन्ही पुत्र प्रिन्स ऑफ वेल्स विल्यिम आणि ड्युक ऑफ ससेक्स हॅरी तसेच स्वत:च्या तिन्ही भावंडांना स्वत:च्या आजारपणाविषयी सांगितले आहे.
वडिलांना कर्करोग झाल्याची माहिती मिळाल्यावर प्रिन्स हॅरी हे त्यांची भेट घेण्यासाठी ब्रिटनला जाणार आहेत. हॅरी हे स्वत:ची पत्नी मेगन मर्केलसोबत अमेरिकेत वास्तव्यास आहेत. किंग चार्ल्स हे लवकर बरे व्हावेत. ते लवकरच पूर्ण शक्तिनिशी परततील असा मला विश्वास आहे. पूर्ण देश त्यांना शुभेच्छा पाठवत असेल हे मी जाणून असल्याचे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी नमूद केले आहे.
8 नोव्हेंबर 2022 रोजी महाराणी एलिझाबेथ यांचे वयाच्या 96 व्या वर्षी निधन झाले होते. त्यानंतर 6 मे 2023 रोजी चार्ल्स यांचा वयाच्या 74 व्या वर्षी राज्याभिषेक झाला होता. किंग चार्ल्स हे ब्रिटनचे आतापर्यंतचे सर्वात वृद्ध राजे ठरले.