वंचितांना शिक्षणात आणणे सर्वश्रेष्ठ!
पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे उद्गार : भारती ठाकूर यांना चतुरंग जीवनगौरव
माशेलकर म्हणाले...
- माणसाचे भवितव्य घडविण्याची क्षमता शिक्षणात
- शिक्षण, रोजगार मिळेल, पण मूल्य संवर्धन सर्वश्रेष्ठ
- कलामांचा विक्रम मी मोडला, माझा विक्रम मोडावा
- देशाचा विकास व्हावा हीच देवाकडे प्रार्थना करतो
फोंडा : माणसाचे भवितव्य घडविण्याची क्षमता शिक्षणामध्ये आहे. शाळा पाहणेही ज्यांच्या नशिबी नव्हते, अशा उपेक्षित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून भारती ठाकूर यांनी केलेल्या कार्यापेक्षा अजून मोठे कार्य होऊच शकत नाही. नर्मदालयाच्या माध्यमातून त्यांनी उभारलेल्या कार्याचा हा खरा गौरव आहे, अशा अचूक आणि समर्पक शब्दात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ व गोमंतकीय सुपुत्र तथा पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी ठाकूर यांच्या कार्याचा गौरव केला.
चतुरंग प्रतिष्ठानतर्फे दिला जाणार यंदाचा जीवन गौरव पुरस्कार नर्मदालय या संस्थेच्या भारती ठाकूर यांना डॉ. माशेलकर यांच्याहस्ते बहाल करण्यात आला. फोंडा येथील कलामंदिरमध्ये काल रविवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या चतुरंगच्या 33 व्या रंगसंमेलनात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान सोहळा थाटात पार पडला. स्वागताध्यक्ष उद्योगपती श्रीनिवास धेंपे, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे व सदस्य दिनेश गुणे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
मूल्य संवर्धन सर्वश्रेष्ठ
नर्मदा परिक्रमेतून भारती ठाकूर यांना मिळालेली सामाजिक कार्याची प्रेरणा ही त्यांच्या मनाची अंतरयात्रा आहे. भारतीय संस्कृतीमध्ये जे जे उत्तम व उदात्त आहे, ते आपण गरीब मुलांची माता होऊन देत आहात. शिक्षणातून विद्या, रोजगार, कौशल्य असे सर्वकाही मिळते, पण मूल्य संवर्धन सर्वश्रेष्ठ असल्याचे डॉ. माशेलकर म्हणाले. अत्यंत कठीण परिस्थितून आपण जो घडलो तो शिक्षणामुळेच. एखाद्याचे भवितव्य घडविण्याची क्षमता शिक्षणामध्ये आहे असे डॉ. माशेलकर पुढे म्हणाले.
आपला विक्रम कुणीतरी मोडावा
डॉ. माशेलकर यांना हल्लीच 51 वी हॉनररी डॉक्टरेट बहाल करण्यात आली. त्याविषयी बोलताना ते म्हणाले की, थोर शास्त्रज्ञ व माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना 48 डॉक्टरेट मिळाल्या होत्या. त्यामुळे आपण त्यांचा विक्रम ओलांडल्याचा आनंद आहे. तिसरी उत्तीर्ण न झाल्याने आपल्या आईला त्यावेळी नोकरी मिळाली नव्हती. आज त्या जेथे कुठे असतील तेथून त्यांना या गोष्टींबद्दल समाधान वाटत असेल अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. आपला हा विक्रम कुणीतरी मोडावा ही इच्छा आहे, पण नर्मदालयाच्या विद्यार्थ्यांनी मोडल्यास त्यापेक्षा अधिक समाधान नसेल. माशेलच्या श्री देवकृष्णाचे दर्शन घेतल्यानंतर आपण स्वत:साठी काहीच मागत नाही. आपला देश विकसित व्हावा हीच प्रार्थना करतो, असेही त्यांनी नमूद केले.
नर्मदालयाच्या कार्याची समाजाला गरज
भारती ठाकूर यांच्या कार्याविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, समाजात डॉक्टर्स, इंजिनीयर घडत राहतील. पण वंचित मुले शिक्षणाच्या प्रवाहात येणे त्यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. नर्मदालय जे काम करते ते सरकार कऊ शकत नाही. अशा कार्यातून प्रेरणा घेऊन असंख्य कार्यकर्ते घडावेत हेच त्यामागील खरे संचित आहे. समाजात आजही अशा कार्याची नितांत गरज आहे. त्यासाठीच भारती ठाकूर सारख्या व्यक्तींच्या जीवनगौरवाला अधिक महत्त्व आहे. केवळ साधनसुविधा निर्माण कऊन विकास होणार नाही, माणूस घडविण्यातून विकास साध्य होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. चतुरंगच्या कार्याची प्रशंसा करताना गोव्यात सांस्कृतिक ठेवा जपण्याचे कार्य ही संस्था सातत्याने करीत असल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला.
डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी चतुरंग व गौरवमूर्तीच्या कार्याचा आढावा घेतला. भारती ठाकूर यांचे जीवन म्हणजे समाज सन्मुखतेच्या कार्याचा सन्यास असल्याचा उल्लेख त्यांनी केला. नर्मदालयाच्या कार्याविषयी माहितीपट यावेळी दाखविण्यात आला. चतुरंग गोवाचे डॉ. दत्ताराम देसाई यांनी आपल्या प्रास्ताविकात सामाजिक क्षेत्रात भारती ठाकूर यांना लाभलेला चतुरंगचा हा नववा पुरस्कार असल्याचे सांगितले. श्रीनिवास धेंपे यांनी स्वागत केले. ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ राजेंद्र केरकर यांच्याहस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. भूषण भावे यांनी स्मरणिकेवर भाष्य केले.
आपल्याला मिळालेला जीवनगौरव पुरस्कार म्हणजे वंचित घटकांसाठी जगभर निस्वार्थीपणे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव असल्याचे भारती ठाकूर यांनी आपल्या मनोगतात सांगितले. नर्मदालयातील मुले, कार्यकर्ते व ज्यांना आपण कधी पाहिलेही नाही, अशा दात्यांनाही त्यांनी हा सन्मान अर्पण केला. नर्मदा परिक्रमाची सुऊवात व त्यातून उभे राहिलेले नर्मदालय याविषयी काही किस्से व प्रसंगही त्यांनी श्रोत्यांपुढे मांडले. एखादे चांगले काम अगदी मनापासून व जिद्दीने सुऊ केल्यास समाज नकळतपणे आपल्या पाठिशी निश्चितपणे उभा राहतो, हा आपला अनुभव असल्याचे त्या म्हणाल्या.
रंगसंमेलनाची सुऊवात अभिनेत्री व प्रसिद्ध नृत्यांगना शर्वरी जेमिनीस व साथी कलाकारांच्या ‘अर्ध्य’ या बहारदार नृत्याने झाली. नर्मदा हा विषय नृत्य अदाकारीतून त्यांनी अंत्यत प्रभावीपणे मांडला. प्रेक्षकांनी प्रत्येक ठेक्याला टाळ्यांनी उत्स्फूर्त दाद देत या नृत्यविष्काराचा मनमुराद आस्वाद घेतला. त्यानंतर संत कवयित्रींच्या रचनावर आधारित ‘अद्वैत’ हा प्रसिद्ध गायिका देवकी पंडित यांचा गायनाचा कार्यक्रम झाला. कवी वैभव जोशी व कमलेश भडकमकर यांची त्यांना साथ लाभली.