कित्तूरचा इतिहास राष्ट्रीय पातळीवर पोहोचवा
कित्तूर उत्सवात सतीश जारकीहोळी यांचे आवाहन
बेळगाव : राणी कित्तूर चन्नम्माजींचा 200 वा विजयोत्सव वैशिष्ट्यापूर्णरित्या साजरा केला जात आहे. कित्तूरचा इतिहास केवळ राज्यापुरता मर्यादित न ठेवता राष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्याची गरज आहे, असे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. बुधवारी कित्तूर उत्सवाचे उद्घाटन करून ते बोलत होते. या माध्यमातून साहित्यिक, कलाकार कला सादर करीत आहेत. कित्तूरचा इतिहास, संगोळ्ळी रायण्णा, आमटूर बाळप्पासह शूर-वीरांचे शौर्य जनतेपर्यंत पोहोचविणे उत्सवामागचा उद्देश आहे. कित्तूर इतिहास अभ्यास केंद्र विजापूरहून बेळगावला स्थलांतरित करण्यात येणार आहे. राणी चन्नम्मा विद्यापीठाचे नाव बदलून कित्तूर राणी चन्नम्मा विद्यापीठ असे करण्यात येणार आहे, असेही जारकीहोळी यांनी सांगितले.
यावेळी महिला बाल कल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते ‘स्वातंत्र्यश्री’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. इंग्रजांविरुद्ध विजयी होणाऱ्या राणी चन्नम्मांचे शौर्य व पराक्रम मोठा आहे. राणी चन्नम्मा, आमटूर बाळप्पा आदी शूर-वीरांचा इतिहास शिकविण्याची गरज आहे, असे हेब्बाळकर यांनी सांगितले. कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात पोस्ट तिकिटाचे अनावरण करण्यात आले. यावेळी कित्तूर राजगुरु संस्थान मठाचे श्री मडिवाळ राजयोगींद्र स्वामीजी, निच्चनके येथील श्री गुरुमडिवाळेश्वर मठाचे पंचाक्षरी स्वामीजी, बैलुरु निष्कल मंटपाचे श्री निजगुणानंद स्वामीजी, बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी, बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्यासह मठाधीश, राजकीय नेते व अधिकारी उपस्थित होते.