दहशतवादाविरुद्ध ‘ब्रिक्स’ची एकजूट
पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध : पंतप्रधान मोदी यांनी मांडलेल्या मुद्द्यांना सर्वच देशांचे समर्थन
वृत्तसंस्था/ रिओ डी जानेरो
ब्राझीलमधील रिओ डी जानेरो येथे सुरू असलेल्या 17 व्या ब्रिक्स परिषदेत सर्व सदस्य देशांनी दहशतवादाच्या मुद्द्यांवर एकजुटीचे दर्शन घडवले. यामध्ये पहलगाम दहशतवादी हल्ला आणि इराणवरील इस्रायली हल्ल्याचा निषेध करण्यात आला. दहशतवाद्यांच्या सीमापार हालचाली, वित्तपुरवठा आणि सुरक्षित आश्रयस्थाने प्रदान करणे यासह सर्व प्रकारच्या प्रकटीकरणांमध्ये दहशतवादाशी लढण्याची आपली वचनबद्धता ‘ब्रिक्स’ने पुन्हा व्यक्त केली. 31 पानांचा आणि 126 मुद्द्यांचा संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध केला. यापूर्वी 1 जुलै रोजी भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश असलेल्या क्वाड गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आला होता.
ब्रिक्स गटाने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करताना आम्ही दहशतवादाविरुद्ध ‘शून्य सहनशीलता’ धोरण सुनिश्चित करण्याचा आणि दहशतवादाविरुद्ध लढताना दुहेरी निकष नाकारण्याचा आग्रह करतो, असे जाहीरनाम्यात म्हटले आहे. ब्राझिलियन किनारपट्टीच्या रिओ डी जानेरो या शहरात झालेल्या ‘ब्रिक्स’च्या दोन दिवसीय शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी, ब्रिक्स राष्ट्रांच्या शीर्ष नेत्यांनी दहशतवादाचा सामना करण्यासाठी ठाम दृष्टिकोन स्पष्ट केला. ब्रिक्स नेत्यांनी ‘रिओ डी जानेरो घोषणापत्र’ प्रसिद्ध केले असून त्यामध्ये दहशतवादाचा धोका, पश्चिम आशियातील परिस्थिती आणि व्यापार आणि शुल्काशी संबंधित मुद्द्यांसह अनेक महत्त्वाच्या जागतिक आव्हानांवर गटाची भूमिका प्रतिबिंबित करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या शिखर परिषदेत पहलगाम दहशतवादी हल्ला हा केवळ भारतावरच नाही तर संपूर्ण मानवतेवर हल्ला असल्याचे स्पष्ट केले. दहशतवादाचा निषेध हे आपले तत्व असले पाहिजे असे सांगतानाच त्यांनी नवीन जागतिक व्यवस्थेची मागणीही मांडली. ‘20 व्या शतकात निर्माण झालेल्या जागतिक संस्था 21 व्या शतकातील आव्हानांना तोंड देण्यात अपयशी ठरल्या आहेत. एआयच्या युगात, तंत्रज्ञान दर आठवड्याला अपडेट केले जाते, परंतु 80 वर्षांतून एकदाही जागतिक संस्था अपडेट केली जात नाही. 20 व्या शतकातील टाइपरायटर 21 व्या शतकातील सॉफ्टवेअर चालवू शकत नाहीत,’ असेही मोदींनी सांगितले.
दहशतवाद हे मानवतेसाठी सर्वात मोठे आव्हान : मोदी
आपल्या भाषणात मोदी म्हणाले, दहशतवाद आज मानवतेसाठी सर्वात गंभीर आव्हान बनले आहे. अलिकडेच भारताला एका अमानवी आणि भ्याड दहशतवादी हल्ल्याचा सामना करावा लागला. 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला हा भारताच्या आत्म्यावर, ओळखीवर आणि प्रतिष्ठेवर थेट हल्ला होता. हा हल्ला केवळ भारतावरच नव्हे तर संपूर्ण मानवतेवर आघात होता. या दु:खाच्या वेळी, मी आमच्यासोबत उभे राहिलेल्या आणि पाठिंबा आणि शोक व्यक्त करणाऱ्या मित्र देशांचे मनापासून आभार मानतो, असे पंतप्रधान म्हणाले.
‘रिफॉर्मिंग ग्लोबल गव्हर्नन्स’ या विषयावरील सत्राला संबोधित करताना मोदी म्हणाले की, ‘20 व्या शतकात बांधलेल्या जागतिक संस्थांमध्ये दोन तृतीयांश मानवतेला अजूनही योग्य प्रतिनिधित्वाचा अभाव आहे. आजच्या जागतिक अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अनेक देशांना अजूनही निर्णय घेण्याच्या टेबलावर स्थान दिले जात नाही. ही खंत केवळ प्रतिनिधित्वाबद्दल नाही, तर ते विश्वासार्हता आणि प्रभावीपणाबद्दल देखील असल्याचे मोदींनी स्पष्ट केले.
ट्रम्प यांची ‘ब्रिक्स’ देशांना कर वाढवण्याची धमकी
ब्रिक्समध्ये सामील होणाऱ्या देशांवर 10 टक्के अतिरिक्त कर लादण्याची धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. ट्रम्प यांनी रविवारी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर लिहिले की, जो देश अमेरिकाविरोधी ब्रिक्स धोरणांशी जुळेल त्यांच्यावर 10 टक्के अतिरिक्त कर लादला जाईल. यातून कोणालाही सूट दिली जाणार नाही. ब्रिक्सच्या जाहीरनाम्यात जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्ल्यूटीओ) नियमांविरुद्ध वाढत्या करांबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली होती. हे कर जागतिक व्यापार आणि पुरवठा साखळीसाठी धोका असल्याचे म्हटले गेले होते. तथापि, यामध्ये अमेरिकेचे थेट नाव घेण्यात आले नव्हते.