For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ढगाळ वातावरणामुळे वीट उत्पादक चिंतेत

11:41 AM Jan 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
ढगाळ वातावरणामुळे वीट उत्पादक चिंतेत
Advertisement

पावसाचीही भीती : तयार झालेल्या कच्या विटा वाचवण्यासाठी धडपड : वातावरणामुळे वीट उत्पादनावर परिणाम

Advertisement

प्रतिनिधी / खानापूर

खानापूर तालुक्यात वीट उत्पादनाच्या कामाला नुकतेच जोरदारपणे सुरुवात झाली आहे. यावर्षी वीट उत्पादक वेगवेगळ्या कारणांमुळे आधीच अडचणीत आहेत. त्यामुळे वीट उत्पादनाच्या कामाला उशीरा सुरुवात झाली. गेल्या दोन-चार दिवसांपासून तालुक्यात ढगाळ हवामान निर्माण झाल्याने वीट उत्पादकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यात सर्वत्रच वीट उत्पादकांनी वीट उत्पादनाला  मोठ्या प्रमाणात सुरुवात केली असून कच्च्या विटा मोठ्या प्रमाणात तयार करण्यात आल्या आहेत. वीटभट्टी लावण्यात अजून आठ-दहा दिवस जाणार आहेत. मात्र ढगाळ वातावरणामुळे तसेच बेळगाव परिसरात झालेल्या पावसामुळे वीट उत्पादकांचे धाबे दणाणले आहेत.

Advertisement

जळाऊ लाकडाचे दर भडकले

खानापूर तालुक्यात वीट उत्पादनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. पूर्वी तालुक्यातच जळाऊ लाकूड तसेच मातीसह इतर कच्चा मालदेखील मोठ्या प्रमाणात सहज उपलब्ध होत होता. यामुळे विटा तयार करण्यासाठी उत्पादन खर्चही कमीच होता. गेल्या काही वर्षात वीट उत्पादनाच्या खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वीट उत्पादनासाठी लागणारे जळाऊ लाकूड महाराष्ट्र किंवा कारवार भागातून आणावे लागते. त्याचे दरही भडकले आहेत. तसेच यावर्षी वाळू उपशावर कडक निर्बंध आल्याने वीट उत्पादनासाठी लागणारा भुस्सा वाळू मिळणे दुरापास्त झाले आहे. भुस्सा वाळूचे दर अव्वाचा सव्वा झाल्याने त्याचा भुर्दंडही वीट उत्पादकांना सोसावा लागला आहे.

Brick manufacturers worried due to cloudy weather

निसर्गाने साथ न दिल्यास वीट उत्पादन कमी

यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प झाल्याने वीट उत्पादनही उशीरा सुरू झाले आहे. वीट उत्पादन सुरू होऊन पंधरा दिवसही झालेले नाहीत तेवढ्यात चार दिवसापासून थंडी कमी झाली असून वातावरणात कोरडेपणा निर्माण झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे वीट व्यावसायिकांनी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. जर पुढील काही महिन्यात वातावरणाचा असाच लहरीपणा राहिल्यास वीट उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार असून वीट उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. आधीच विटांचे दरही गगनाला भिडलेले आहेत. निसर्गाने साथ न दिल्यास वीट उत्पादन कमी होऊन विटांचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.