Karad News : ओगलेवाडीतील टेंभू उपसा सिंचन कार्यालयात लाच प्रकरण; दोन अधिकारी जाळ्यात
कराडमध्ये टेंभू योजनेतील दोन अधिकाऱ्यांची लाच प्रकरणात अटक
कराड : ओगलेवाडी (ता. कराड) येथील टेंभू उपसा सिंचन योजनेच्या कार्यालयातील सुरक्षा रक्षकांच्या बिलापोटी लाचेची मागणी करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने शुक्रवारी रंगेहाथ पकडले.
टेंभू उपसा सिंचन योजनेच्या ओगलेवाडी कार्यालयातील कार्यकारी अभियंता आनंद रामदास काळमेघ (रा. सिल्वर ओक बिल्डींग, विद्यानगर) आणि कनिष्ठ अभियंता माधुरी साई देवरे (रा. सिल्वर गार्डनअपार्टमेंट, बनवडी फाटा) अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंध विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार कार्यकारी अभियंता टेंभू उपसा सिंचन यांत्रिक विद्युत पथक योजना ओगलेवाडी कार्यालयात सिक्युरिटी एजन्सीमार्फत सुरक्षारक्षक पुरवण्याचे काम करतात. त्यांनी प्रतिदिन ६१० रूपयांप्रमाणे तीन सुरक्षा रक्षक पुरवले होते. सुरक्षा रक्षक पुरवल्यानंतर त्यांचे एकूण ५ लाख ९४ हजार ७२० रुपये बिल कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे कार्यालयात कराड येथील टेंभू कार्यालयामार्फत पाठवले होते.
त्यानुसार १२ नोव्हेंबर २०२५ रोजी तक्रारदारांच्या खात्यावर ४ लाख ६६ हजार ९६० रुपयांचे बिल जमा झाले. हे बिल मंजुरीसाठी पाठवले आणि मंजूर झालेल्या बिलाच्या ३ टक्के प्रमाणे माधुरी देवरे यांनी तक्रारदाराकडे १७हजार रूपये लाचेची मागणी केली. त्यांनी कार्यकारी अभियंता काळमेघ यांची भेट घेण्यास सांगितले. यावेळी कार्यकारी अभियंता काळमेघ यांनी तक्रारदारास मंजूर झालेल्या बिलाच्या अनुषंगाने ३० हजार रूपयांची मागणी करून तडजोडीअंती २५ हजार रुपये लाचेची मागणी केली.
दरम्यान, शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सापळा रचला. त्यात आनंद काळमेघ, माधुरी देवरे यांनी २५ हजार रुपये आणि १७हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
त्यांच्यावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या कारवाईत लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पोलीस हवालदार गणेश ताटे, निलेश राजपुरे प्रियांका जाधव, विक्रमसिंह कणसे, नवनाथ
शिंदे, सत्यम थोरात, स्नेहल गुरव, महेश पुजारी यांनी सहभाग घेतला. तसेच लाच मागणी संदर्भात नागरिकांना तक्रार असल्यास उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंध विभाग सातारा यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.