breaking- विधानसभा अध्यक्षांना अपशब्द? आमदार जयंत पाटलांचे निलंबन, मविआचा सभात्याग
jayantpatilbreaking- नागपूर अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना अपशब्द वापरल्याने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांना चांगले महागात पडले आहे. जयंत पाटील यांना नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीसाठी निलंबन करण्यात आलं आहे. विधानसभा अध्यक्षांबाबत बोलताना जयंत पाटील यांनी "निर्लज्जपणा" असा शब्द वापरला होता. त्यानंतर पाटील यांच्या निलंबनाचा निर्णय घेण्यात आला.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत व दिशा सॅलियन हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची एसआयटी चौकशी केली जाईल, असं उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितलं. त्यावर विरोधकांना बोलू दिलं जात नाही, असं म्हणत विरोधीपक्षातील आमदार सभागृहाच्या वेलमध्ये उतरले. त्यावेळी जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना सुनावलं. यावेळी जयंत पाटील यांच्याकडून अध्यक्षांना उद्देशून असंविधानिक शब्दाचा वापर केल्याचा आरोप आहे.
जंयत पाटील यांच्यावरील कारवाईनंतर विरोधीपक्ष आक्रमक झाले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली.जयंत पाटील यांच्याकडून जे घडलं त्या संदर्भात मी दिलगिरी व्यक्त कर असे अजित पवार म्हणाले.
सभागृहात नेमकं काय घडलं?
सत्ताधारी बाकावरून १४ जणांना बोलण्याची संधी दिली आणि विरोधी बाकावरून एका सदस्याला बोलण्याची संधी दिली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. पण विधानसभा अध्यक्षांकडून मागणी फेटाळण्यात आली. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी संताप व्यक्त करत 'तुम्ही असा निर्लज्जपणा करु नका', असे म्हटले. जयंत पाटील यांच्या वक्तव्यानंतर सत्ताधारी आणखीच आक्रमक झाले.