एकजुटीच्या प्रदर्शनासाठी पुन्हा ‘ब्रेक फास्ट मिटींग’
उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या निवासस्थानी आयोजन : सिद्धरामय्यांना निमंत्रण
प्रतिनिधी/ बेंगळूर
मुख्यमंत्रिपदावरून निर्माण झालेला गोंधळ तात्पुरता मिटविल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांनी एकजुटता दाखविली आहे. आता पुन्हा एकदा एकजुटीचे प्रदर्शन करण्यासाठी मंगळवारी ‘ब्रेक फास्ट मिटींग’ आयोजिण्यात आली आहे. मात्र, यावेळी शिवकुमारांनी मुख्यमंत्र्यांना बेंगळुरातील आपल्या निवासस्थानी आमंत्रित केले आहे. सिद्धरामय्यांनीही निमंत्रण स्वीकारले आहे. त्यामुळे या बैठकीविषयी कुतूहल निर्माण झाले आहे.
राज्यातील काँग्रेस सरकारला अडीच वर्षे पूर्ण झाल्याने उर्वरित कालावधीसाठी आपल्याला मुख्यमंत्री बनवावे, यासाठी डी. के. शिवकुमार यांनी समर्थक आमदारांना दिल्लीला पाठवून पक्षश्रेष्ठींवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे काँग्रेसमधील दोन गटांमध्ये वर्चस्वावरून रस्सीखेच सुरू झाली. मात्र, हायकमांडने याची गांभीर्याने दखल घेत सिद्धरामय्या व शिवकुमार यांना परस्पर चर्चेद्वारे वादावर पडदा टाकण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शनिवार 29 नोव्हेंबर रोजी सिद्धरामय्यांनी आपल्या निवासस्थानी ब्रेक फास्ट मिटींगचे आयोजन करून शिवकुमारांना निमंत्रित केले होते. या निमित्ताने त्यांनी चर्चा करून आमच्यात मतभेद नाहीत, आम्ही एकत्रपणे काम करत आहोत, असे जाहीरपणे सांगितले होते.
आता शिवकुमार यांनी मंगळवारी सदाशिवनगर येथील निवासस्थानी नाश्त्यासाठी सिद्धरामय्यांना निमंत्रण दिले आहे. तसे पाहिले तर सोमवारीच याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु, सोमवारऐवजी मंगळवारी ब्रेक फास्ट मिटींगचे आयोजन केले आहे. ही सौहार्दपूर्ण असली तरी राजकीय वर्तुळात याविषयी तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.
येत्या 8 डिसेंबरपासून बेळगावमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होत आहे. अधिकार हस्तांतराच्या मुद्द्यावरून सरकारमध्ये सुरू असलेल्या गोंधळचा मुद्दा विरोधी पक्षांना अधिवेशनात आयते कोलित मिळाल्यासारखे आहे. मात्र, आमच्यात मतभेद नसल्याचे दाखवून देण्यासाठी सिद्धरामय्या व डी. के. शिवकुमार यांनी एकजुटीचे प्रदर्शन करण्याचे ठरविले आहे. त्यासाठीच दोन्ही नेत्यांनी मंगळवारी पुन्हा एकदा नाश्त्याच्या निमित्ताने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.
खर्गेंनी घेतली सोनिया गांधी, राहुल गांधींची भेट
दोन्ही नेत्यांमधील वादावर तात्पुरता पडदा पडला असला तरी विधिमंडळ अधिवेशन किंवा मार्च महिन्यात होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर पुन्हा एकदा ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुख्यमंत्रिपदाच्या अधिकार हस्तांतरावर तोडगा काढण्याचा मुद्दा सध्या काँग्रेस हायकमांडच्या दारी आहे. हायकमांड याविषयी योग्य वेळी योग्य निर्णय घेणार आहे. रविवारी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांची भेट घेऊन कर्नाटकातील राजकीय परिस्थितीचा अहवाल सादर करून शक्य तितक्या लवकर सुवर्णमध्य काढण्याची विनंती केली आहे.
लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीला
त्यामुळे सोनिया गांधी व राहुल गांधी शक्य तितक्या लवकर वेळ काढून सिद्धरामय्या व शिवकुमार यांना दिल्लीला बोलावून निर्णय घेण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून समजते. संसदेचे अधिवेशन सुरू झाले आहे. त्यामुळे 6 डिसेंबर रोजी वेळ मिळाला तर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना दिल्लीला बोलावून घेतले जाण्याची शक्यता आहे.