रेशनकार्डच्या कामाला आचारसंहितेचा ब्रेक
वर्षभरापासून काम ठप्प : गोरगरीब लाभार्थी सुविधांपासून वंचित
प्रतिनिधी / बेळगाव
मागील वर्षभरापासून नवीन रेशनकार्डच्या कामाला स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे अनेक दारिद्र्या रेषेखालील गोरगरिबांना शासकीय सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. तसेच सद्यस्थितीत लोकसभेच्या आचारसंहितेमुळे हे काम सुरू होण्याची शक्यता धूसर बनली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना आचारसंहिता संपण्याची वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
काँग्रेस सरकारने पाच गॅरंटी योजना सुरू केल्या आहेत. त्यापैकी गृहलक्ष्मी योजनेंतर्गत कुटुंबातील प्रमुख महिलेला दरमहा दोन हजार रुपये दिले जात आहेत. त्यामुळे मागील वर्षापासून रेशनकार्डची मागणी दुपटीने वाढली आहे. जिल्ह्यात 89 हजार 140 जणांनी अर्ज केले आहेत. मात्र कामच बंद असल्याने लाभार्थ्यांसमोर प्रतीक्षेशिवाय दुसरा मार्ग शिल्लक राहिला नाही.
डिसेंबरदरम्यान अधिवेशनावेळी काहीकाळ रेशनकार्ड कामाला चालना देण्यात आली. मात्र या काळात काही मोजक्यांच्याच हाती रेशनकार्ड पडले. मात्र अद्याप हजारो लाभार्थी रेशनकार्डच्या प्रतीक्षेत आहेत. सद्यस्थितीत नवीन रेशनकार्ड आणि रेशनकार्डच्या दुरुस्तीचे कामही थांबले आहे. त्यामुळे रेशनकार्डविना लाभार्थ्यांसमोर अडचणी येवू लागल्या आहेत. सद्यस्थितीत माणसी 5 किलो तांदळाचा पुरवठा केला जात आहे आणि अन्नभाग्य योजनेंतर्गत माणसी 170 रुपये दिले जात आहेत. त्यामुळे रेशनकार्डची मागणी वाढली आहे. मागील दोन वर्षांत नवीन रेशनकार्डचे काम विस्कळीत झाले आहे. केवळ काहीकाळच रेशनकार्डला चालना मिळाली आहे. त्यामुळे हजारो नागरिक रेशनकार्डपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे शैक्षणिक प्रवेश, अन्नभाग्य योजना, गृहलक्ष्मी योजना आणि इतर शासकीय कामेही प्रलंबित आहेत. अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री मुनीयप्पा यांनी रेशनकार्डच्या कामाला लवकरच चालना दिली जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र लोकसभा निवडणूक आणि इतर कामांमुळे हे आश्वासनही हवेत विरले आहे.
मागील दोन वर्षांपासून लाभार्थ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. काही लाभार्थ्यांनी पुन्हा ऑनलाईन अर्ज केले आहेत. तर काही लाभार्थ्यांच्या जात व उत्पन्नाच्या दाखल्याची मुदत संपली आहे. त्यामुळे पुन्हा अर्ज करावा लागणार आहे. परिणामी लाभार्थ्यांची रेशनकार्डसाठी डोकेदुखी वाढली आहे. मागील दहा महिन्यांपासून बीपीएल कार्डसाठी दररोज 20 ते 30 अर्ज येवू लागले आहेत. यापैकी बहुतांश अर्ज शहरी भागातील आहेत.
प्रतिक्रिया
आचारसंहिता संपल्यानंतरच नवीन बीपीएलकार्डचे वितरण
राज्यात नवीन बीपीएल कार्डसाठी ऑनलाईन अर्ज केलेली रेशनकार्डची प्रक्रिया थांबली आहे. निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर नवीन बीपीएलकार्डचे वितरण होवू शकेल.
-श्रीशैल कंकणवाडी-सहसंचालक अन्न व नागरी पुरवठा खाते