भारतासोबत रणनीतिक आघाडीची योजना : ब्राझील
ब्राझीलच्या लोकांना भारतीय पसंत : अध्यक्ष लूला यांचे वक्तव्य
वृत्तसंस्था/ ब्राझिलिया
भारतासोबत राजनयिक, आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य वाढविण्यासाठी एक रणनीतिक आघाडी निर्माण करण्याची योजना आम्ही तयार करत आहोत, असे ब्राझीलचे अध्यक्ष लुईज इनासियो लूला डी सिल्वा यांनी म्हटले आहे. ब्राझीलचे उपाध्यक्ष गेराल्डो अल्कमिन यांच्या भारत दौऱ्यानंतर त्यांनी ही घोषणा केली आहे.
लूला यांनी स्वत:च्या संदेशात भारताच्या क्षमतांचे कौतुक करत भारताला ब्राझीलच्या भविष्याच्या विकासासाठी एक असाधारण भागीदार ठरविले. पुढील वर्षाच्या प्रारंभी माझ्या दौऱ्याच्या तयारीसाठी उपाध्यक्ष गेराल्डो अल्कमिन यांचा भारत दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. भारत एक असाधारण बाजारपेठ असून आम्ही भारतासोबत एक आकर्षक आघाडी निर्माण करू शकतो. ही आघाडी राजनयिक, अंतराळ, उद्योजकता आणि आर्थिक क्षेत्रांमध्ये असेल असे उद्गार लूला यांनी काढले आहेत.
जागतिक व्यापारात वाढत्या तणावादरम्यान भारत आणि ब्राझीलचे संबंध मजबूत होत आहेत. ऑगस्ट महिन्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्राझीलवर 50 टक्के आयातशुल्क लादले होते. तर भारतीय उत्पादनांवरही त्यांनी 50 टक्के आयातशुल्क लादण्याचा निर्णय घेतला होता.
भारत आणि ब्राझील परस्परांचा सन्मान करत मैत्रीपूर्ण संबंध राखून आहेत. भारतीय ब्राझीलला पसंत करतात आणि ब्राझीलचे लोक भारतीयांना. याचमुळे आम्ही भारतासोबत एक मजबूत रणनीतिक भागीदारी निर्माण करू आणि दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांना पुढे नेऊ, असे वक्तव्य लूला यांनी केले आहे.
जुलै महिन्यात शिखर परिषदेदरम्यान लूला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट झाली होती, यादरम्यान व्यापार, संरक्षण आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मजबूत सहकार्याचा रोडमॅप निश्चित करण्यात आला होता. तर लूला हे 2026 च्या प्रारंभी भारताचा दौरा करणार आहेत.
ब्राझीलचे उपाध्यक्ष एल्कमिन यांचा भारत दौरा व्यापारी संबंध मजबूत करणे आणि भारतीय बाजारपेठेत काम करण्यासाठी इच्छुक ब्राझिलियन कंपन्यांसाठी नव्या संधी शोधण्याच्या उद्देशाने पार पडला होता. एल्कमिन यांच्या दौऱ्यात एम्ब्dरोयर कंपनीने भारतात नवे कार्यालय सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.