कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जिगरबाज गडी !

06:00 AM Aug 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारत इंग्लंड दौऱ्यावर रवाना झाला तेव्हा मर्यादित सामने खेळणार हे माहीत असूनही सर्वांचं अन् खुद्द इंग्लिश खेळाडूचंही लक्ष होतं ते जसप्रीत बुमराह काय करामती करतो यावर...पण प्रत्यक्षात मालिका पुढं सरकू लागली तशी बुमराहला खेळून काढण्याची क्लृप्ती यजमानांनी शोधून काढली अन् त्यांना त्याऐवजी बाधू लागला तो मोहम्मद सिराज...भारतानं पाचव्या कसोटीत मिळविलेला विजय अन् मालिकेत साधलेली बरोबरी यात मोलाचा वाटा आहे तो याच वेगवान गोलंदाजाचा...

Advertisement

वेळ सकाळची 11 वाजून 56 मिनिटं...‘त्याचा’ खतरनाक यॉर्कर अॅटकिन्सनच्या उजव्या यष्टीवर आदळला आणि इंग्लंडची शेवटच्या दिवशी 56 मिनिटं व 53 चेंडू चाललेली वळवळ संपली...भारतानं अवघ्या सहा धावांनी विजय मिळवून कसोटी मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली...‘त्यानं’ मालिकेत टाकले 42 स्पेल अन् 1122 चेंडू. विशेष म्हणजे त्यातील बहुतांश चेंडूंनी फलंदाजांवर आग ओकली ती ताशी 140 किलोमीटर्सहून अधिक वेगानं. ‘त्यानं’ तब्बल 283 वेळा फलंदाजांना चकविलं आणि सर्वांत जास्त 23 बळी घेत इंग्लंडचा सुपडा साफ केला...नाव : ‘भेदक’ बुमराहच्या अनुपस्थितीत भारतीय जलदगती गोलंदाजांचं नेतृत्व करणारा मोहम्मद सिराज...

Advertisement

सिराजला गोलंदाजी करताना पाहणं हा क्रिकेट रसिकांच्या दृष्टीनं सुखद अनुभव. त्याच्यावर एरव्ही प्रत्येक वेळी मारा करण्याची पाळी आलीय ती महान जसप्रीत बुमराह अन् स्विंगसाठी प्रसिद्ध मोहम्मद शमीच्या छायेत. त्यानं कारकिर्दीत टीकेची, सोशल मीडियावरील ‘ट्रोल्स’ची कधीच पर्वा केलेली नाहीये. धुरंधर अर्जुनाप्रमाणं मोहम्मद सिराजचं लक्ष असतं ते फक्त फलंदाजावर, तो मैदानाच्या कुठल्याही बाजूनं गोलंदाजी टाकतोय त्यावर नव्हे. उदाहरणार्थ लीड्स कसोटीच्या वेळी त्यानं खेळपट्टीची जी बाजू वापरली ती गतीला अजिबात योग्य नव्हती. पण त्यावर विचार करण्यात मोहम्मदला मुळीच रस नव्हता...

एजबॅस्टन कसोटी पाचव्या दिवशी भारतानं जिंकली ती तब्बल 336 धावांनी. पहिल्या डावात 6 बळी मिळविणाऱ्या सिराजचा आपल्या विजयाची दारं उघडण्यात मोलाचा वाटा राहिला...परंतु जानेवारी महिन्यात एकदिवसीय सामन्यांच्या ‘चॅम्पियन्स चषका’साठीच्या संघात त्याला स्थान देण्यात आलं नव्हतं. रोहित शर्माला पत्रकारांनी त्याविषयी प्रश्न विचारताच भारताचा तत्कालीन कर्णधार म्हणाला होता, ‘मोहम्मद सिराजला जुन्या चेंडूच्या साहाय्यानं प्रभावी गोलंदाजी करणं जमत नाही’...

एकदिवसीय क्रिकेटमध्ये जुन्या चेंडूनं सर्वांत जास्त बळी मिळविणाऱ्या नि शेवटच्या षटकांत 48.2 टक्के निर्धाव चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजाचं माजी कर्णधारानं केलेलं विश्लेषण 100 टक्के चुकीचं होतं. मग ‘इंडियन प्रीमियर लीग’ सुरू होण्यापूर्वी पत्रकार परिषदेत मोहम्मद सिराजनं म्हटलं, ‘माझ्या शब्दांऐवजी आकडेच चांगल्या पद्धतीनं काय ते सांगतील’...खुद्द रोहित शर्मानंच 2023 मध्ये भारतात रंगलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेच्या अहमदाबाद इथं झालेल्या अंतिम सामन्यात नवीन चेंडू सिराजऐवजी सोपविला होता तो मोहम्मद शमीकडे. खरं म्हणजे संपूर्ण स्पर्धेत भारतीय माऱ्याची सुरुवात करताना त्यानं अप्रतिम गोलंदाजीचं दर्शन घडविलं होतं...

त्याच्या काही महिने अगोदर मोहम्मद सिराजनं आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रेमदासा स्टेडियमवर श्रीलंकेच्या तंबूत हाहाकार माजविला होता तो अवघ्या 21 धावांत 6 फलंदाजांचा खात्मा करून. एका षटकात तर त्यानं चार जणांना गारद केलं होतं. मग श्रीलंकेचा डाव अवघ्या 50 धावांत आटोपला आणि भारतानं अगदी आरामात स्पर्धा जिंकली...सिराजचं वर्णन करताना ‘सर्वांचाच उत्साह वाढविणारा’ अन् ‘आक्रमक’ या शब्दांचा वापर करावाच लागेल. पण बळी मिळविण्याच्या त्याच्या भूकेला नमूद करण्याच्या भानगडीत मात्र विश्लेषक फारसे पडत नाहीत...मोहम्मद सिराजच्या कारकिर्दीत फार मोठा हात आहे तो जीवनात अनुभवलेल्या कठीण प्रसंगांचा...

हैदराबादमधील टोली चौकीपासून सुरुवात करणाऱ्या आणि कधीही हार न मानणाऱ्या या गोलंदाजानं प्रवासात फार मोठी झेप घेतलीय एवढं मात्र खरं...सुरुवातीचं क्रिकेट रबर स्लिपर्स घालून खेळणाऱ्या मोहम्मदनं 2015 पर्यंत ‘लेदर बॉल’नं देखील गोलंदाजी केली नव्हती असं सांगितल्यास एखाद्यावर घेरी येण्याची पाळी येईल...2020 साली ‘बॉक्सिंग डे’ कसोटीत मेलबर्नवर तब्बल 27 षटकं अजिंक्य रहाणेनं त्याला गोलंदाजीच दिली नाही. मग त्यानं सरळ कर्णधारालाच विचारलं की, गोलंदाजी टाकण्याची संधी केव्हा मिळणार ?...

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत 500 हून जास्त धावा जमविणारा भारताचा भरवशाचा फलंदाज रवींद्र जडेजा लॉर्ड्स कसोटी वाचविण्याकरिता अक्षरश: झुंजला. त्याला सिराज हा एक भावनिक खेळाडू असल्याचं माहीत असल्यामुळं प्रेरणा देण्यासाठी जडेजानं आठवण करून दिली ती आयुष्यात फार त्रास सोसलेल्या त्याच्या वडिलांची. परंतु चांगल्या प्रकारे प्रतिकार केलेल्या सिराजचा त्रिफळा उडाला आणि भारत फक्त 22 धावांनी हरला...

मोहम्मद सिराजचा ओव्हल कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी डीप स्क्वेअर लेगवर क्षेत्ररक्षण करताना सीमारेषेला पाय लागल्यानं हॅरी ब्रूकचा झेल पकडूनही इंग्लिश फलंदाजाला नाबाद ठरविण्यात आलं. त्यावेळी तो खेळत होता अवघ्या 19 धावांवर. त्या महाभयंकर चुकीनं खरं म्हणजे भारतावर कसोटी सामनाच गमावण्याची पाळी आली होती. पण त्याची भरपाई त्यानं गोलंदाजीत केली...सोमवारी दमट हवामानानं भारताला साथ दिली आणि 77 षटकं जुन्या ‘ड्यूक्स’ चेंडूच्या साहाय्यानं सिराजनं आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केलं...

इंग्लंडविरुद्धच्या सर्व पाचही कसोटी सामन्यांत प्रत्येक दिवशी खेळलेला तो एकमेव गोलंदाज. ‘सेना’ म्हणजेच दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड अन् ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये भारतानं नोंद केलीय ती 10 विजयांची आणि त्यात प्रत्येक वेळी सिराज चमकलाय...पोर्तुगालचा महान फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डोचा ‘बिलिव्ह’ या शब्दावर फार मोठा विश्वास. मोहम्मद सिराजनंही त्याला उचललंय आणि कुठल्याही गोष्टीची पर्वा न करता, कुठल्याही प्रकारच्या दबावाला भीक न घालता गोलंदाजी टाकण्याची कला साध्य केलीय...सध्याच्या क्रीडा जगतावर फार मोठं वर्चस्व मिळविलंय ते वैद्यकशास्त्रानं. त्यामुळं एखाद्या खेळाडूचं झोपणं, त्याचा आहार, त्याची क्षमता नि स्नायू, ह्रदय वगैर बाबींचं विश्लेषण करणं फारसं कठीण राहिलेलं नाहीये. पण शक्य होत नाही ते माणसाच्या स्वभावाचं विश्लेषण करणं...मोहम्मद सिराजनं इंग्लंडमधील 25 दिवसांत दर्शन घडविलं ते त्याचंच !

भेदक कारकीर्द...

- राजू प्रभू

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article