सिद्धी ब्रह्मज्ञानप्राप्तीत अडथळा निर्माण करतात
अध्याय चौथा
प्राणायामच्या अभ्यासाने वर जाणारा प्राणवायू व खाली जाणारा अपान वायू यांची गती रोखली जाऊन वायू उदरात स्थिर होतात. वायुविजय मिळवल्यानंतर त्या वायूला नाकपुडीतच खेळवणे याला पूरक असे म्हणतात. या स्थितीत जितका वेळ सहजी राहता येणे शक्य आहे तेव्हढा वेळ राहिल्यावर रोखून धरलेले वायू सोडून देण्याला रेचक असे म्हणतात. श्वासोच्छ्वास करणे थांबवून वायूची गती रोखली गेली की, कुंभक सिद्ध होतो. ह्यामुळे वायू मुलाधारस्थानी स्थिर होतो. प्राणायामचा नियमित अभ्यास करणाऱ्याला भूत भविष्य कळू लागते. त्याचा त्याने लोककल्याण साधण्यासाठी उपयोग करावा. बारा उत्तम प्राणायामांनी एक धारणा होते असे मानले आहे. दोन धारणा म्हणजे योग होतो. योगीश्वराने त्या दोन धारणांचा सर्वदा अभ्यास करावा. दोन धारणा सिद्ध झाल्या की, साधकाच्या सर्व वासना जळून जाऊन तो योगी होतो. वासनांचा आवेग आवरण्यासाठी आणि ज्ञानसंपादन लवकर व्हावं यासाठी एक साधन म्हणून प्राणायाम करणं आवश्यक आहे. विषयवासनेला आवर बसला की, कर्मयोग सहजी आचरला जातो आणि निरपेक्षतेनं कर्म करण्याचा स्वभाव बनला की, मनुष्य आपोआपच संन्यासी होतो. मूलबंध, जालंदरबंध इत्यादि भाग योगशास्त्रात वर्णिले आहेत पण ते हटयोगासाठी आवश्यक आहेत. ब्रह्मज्ञान सिद्धीसाठी त्याचा उपयोग होत नाही. म्हणून ज्याला ब्रह्मज्ञान मिळवायचे आहे त्याने पूरक, रेचक आणि कुंभक ह्या प्राणायाम पद्धतींचा अभ्यास केला तरी पुरेसे आहे. जो ह्यापुढील अभ्यास करेल तो त्रिकाल ज्ञानी होऊन त्याला त्रैलोक्य वश होईल असे बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.
एवं यऽ कुरुते राजंस्त्रिकालज्ञऽ स जायते ।
अनायासेन तस्य स्याद्वश्यं लोकत्रयं नृप ।। 35 ।।
अर्थ- हे राजा, याप्रमाणे जो करतो तो त्रिकालज्ञानी होतो. हे नृपा, त्याला अनायासे त्रैलोक्य वश होते.
विवरण- प्राणायामचा ब्रह्मज्ञान मिळवण्यासाठी आवश्यक तो अभ्यास कोणता ते बाप्पानी सांगितलं. त्याच्याही पुढे प्राणायामचा अभ्यास असून त्यातून साधकाला महाध्यानरुप प्राणायाम साध्य होतो. त्यामुळे त्याला अनेक सिद्धी प्राप्त होतात पण या सिद्धी लोककल्याणासाठी न वापरता बऱ्याचवेळा अर्थार्जन व लोकप्रियता मिळवण्यासाठी वापरण्याचा साधकाला अनिवार मोह होतो. कारण त्यातून मिळणारा पैसा व प्रसिद्धी त्याला खुणावत असते. म्हणूनच बाप्पा म्हणतात की, प्राणायामचा अतिरिक्त अभ्यास साधकाला त्याच्या मूळ उद्दिष्टांपासून दूर नेतो कारण त्यातून मिळणाऱ्या सिद्धी ब्रह्मज्ञान प्राप्तीत अडथळा आणतात. मोक्षप्राप्ती करण्यासाठी सिद्धी मिळवण्याची गरज नसते. म्हणून भगवद्गीतेत सिद्धीचा उल्लेख कुठंही केलेला नाही. पुढील श्लोकात बाप्पा सांगत आहेत की, कर्मयोग आणि संन्यास हे दोन्ही समान फल देणारे आहेत.
ब्रह्मरूपं जगत्सर्वं पश्यति स्वान्तरात्मनि ।
एवं योगश्च संन्यासऽ समानफलदायिनौ ।। 36 ।।
अर्थ- सर्व जग ब्रह्मरूप आहे व स्वत:च्या अंतरात्म्यामध्ये आहे असे त्याला दिसते. या प्रकारे योग व संन्यास हे दोन्ही समान फल देणारे आहेत.
विवरण-माणसाच्या अंगात एकदा निरपेक्षता भिनली की, त्याला सर्वांच्यातील ब्रह्माचा साक्षात्कार होऊ लागतो व त्याच्या लोककल्याणकारी कार्याला बहर येतो. लोककल्याणकारी कार्य करणे एव्हढंच त्याच्या जीवनाचं उद्दिष्ट असतं. ज्याला पहिल्यापासूनच संसारादि गोष्टींची नावड असते. तो मुळातच संसाराच्या फंदात न पडता संन्यासी होतो. आहे या परिस्थितीत त्याला कोणताही बदल अपेक्षित नसतो. निरपेक्षता स्वभावात भिनलेली असल्याने निरपेक्षतेनं कर्म करणाऱ्या मनुष्याची मानसिक अवस्था संन्यासी व्यक्तीसारखीच असते.
क्रमश: