Solapur : दाजी पेठेतील व्यंकटेश्वर देवस्थानात भक्तिमय वातावरणात ब्रह्मोत्सव साजरा
सोलापुरात ब्रह्मोत्सवाचा आज समारोप
सोलापूर : पूर्व भागातील दाजी पेठेतील श्री व्यंकटेश्वर देवस्थानात ब्रह्मोत्सवनिमित्त रविवारी भगवान व्यंकटेश्वरांच्या मूळमूर्तीस कलशाभिषेक करण्यात आला. बुधवार, २९ ऑक्टोबरपासून ब्रह्मोत्सवाला सुरुवात झाली. रविवारी या उत्सवाचा पाचवा दिवस होता. तिरुमला तिरुपती देवस्थानच्या धर्तीबर दाजी पेठ येथील व्यंकटेश्वर देवस्थानात ब्रम्होत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. यंदा ब्रह्मोसवाचे ५३ वे वर्ष आहे. रविवारी सकाळी ७ वाजता होमहवन करण्यात आला.
त्यानंतर अश्ववाहसेवा करण्यात आली. सकाळी ९ ते १२ या वेळेत भगवान व्यंकटेश्वरांच्या मूळमूर्तीस ८१ उत्तमोत्तम कलशस्नपन (कलशाभिषेक) करण्यात आला. सायंकाळी ६ ते ९ या वेळेत गरुडवाहन सेवा, तीर्थप्रसाद गोष्टी आदी विधी पार पडले. तिरुमलाहून आलेल्या पुरोहितवृंदाकडून मंत्रोच्चारात हे विधी करण्यात आले. दाक्षिणात्य वाद्यवृंदांच्या मंजुळ स्वरात झालेल्या या विधींमुळे मंदिरातील वातावरण पवित्र व भक्तिमय झाले होते.
दरम्यान रविवारी सुट्टी असल्याने दिवसभर ते सायंकाळपर्यंत भक्तगणांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष रायलिंग आडम, विश्वस्त राजेशम येमुल, व्यंकटेश चिलका, जयेंद्र द्यावनपल्ली, लक्ष्मीनारायण कमटम, गोविंद बुरा, श्रीनिवास गाली, राजीव जक्कन, श्रीनिवास बोद्धल आदी उपस्थित होते.
ब्रह्मोत्सवाचा होणार आज समारोप
गत पाच दिवसापासून सुरू असलेल्या ब्रह्मोत्सवाचा सोमवारी समारोप होणार आहे. सोमवारी सकाळी ७.३० वाजता होमहवन, सूर्यप्रभा वाहन सेवा, सकाळी ९ ते १२ या वेळेत होमहवन, चक्रस्नानम् (चक्रतीर्थ), आराधना, शातुमुरे, तीर्थप्रसाद गोष्टी होणार आहेत. सायंकाळी ५ ते ९ या वेळेत आराधना, चंद्रप्रभा वाहन सेवा, होमहवन, महापुर्णाहूती, देवतोउद्वासनम्, श्री पुष्पयागम्, द्वादशाराधना, वसंतोत्सवम् (वनविहार), ध्वजपट अवरोहणम्, शातुमुरै, कुंभप्रोक्षणम, तीर्थप्रसाद गोष्टी आदी कार्यक्रम होऊन ब्रह्मोत्सवाचा समारोप होणार आहे. समारोपाच्या उत्सवात भक्तगणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.