Solapur : सोलापुरात व्यंकटेश्वर देवस्थानात ब्रह्मोत्सवाची ध्वजारोहणाने सुरुवात
दाजी पेठेतील व्यंकटेश्वर देवस्थानात धार्मिक जल्लोष.
सोलापूर : पूर्व भागातील दाजी पेठेतील श्री व्यंकटेश्वर देवस्थानात ब्रस्त्रोत्सवनिमित्त गुरुवारी ध्वजपट प्रतिष्ठापना, ध्वजारोहण यासह विविध विधी पार पडले.
तिरुमला तिरुपती देवस्थानच्या धर्तीवर दाजी पेठ येथील व्यंकटेश्वर देवस्थानात ब्रम्होत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. यंदा ब्रह्मोसवाचे ५३ वे वर्ष आहे. ब्रह्मोसवाच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी पहाटे ५.३० वाजता 'श्री' च्या मूळमूर्तीस अभिषेक करण्यात आला. सकाळी ९ ते ११.३० या वेळेत पालखी सेवा करण्यात आली.
त्यानंतर ध्वजपट प्रतिष्ठापना, ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. यावेळी मंदिरातील स्तंभावर गरुह प्रतिमा असलेल्या ध्वजाचे रोहण करण्यात आले. तदनंतर होमहवन, आराधना, शातुमुरै हे विधी करण्यात आले.
सायंकाळच्या सत्रात भेरी पूजा, देवताआवाहन, होमहवन, शेषवाहन सेवा करण्यात आली. तिरुमलाहून आलेल्या पुरोहितवृंदाने धार्मिक विधी केले. दाक्षिणात्य वाद्यांच्या मंजुळ स्वरात हे सर्व विधी पार पडले. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष रायलिंग आडम, विश्वरत राजेशम येमुल, व्यंकटेश चिलका, जयेंद्र द्यावनपल्ली, लक्ष्मीनारायण कमटम, गोविंद बुरा, श्रीनिवास गाली, राजीव जक्कन, श्रीनिवास बोद्धल आदी उपस्थित होते.