For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

`ब्रह्मिभुत किंवा आत्मभुत अवस्था

06:23 AM Jul 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
 ब्रह्मिभुत किंवा आत्मभुत अवस्था
Advertisement

अध्याय पहिला

Advertisement

माणसाच्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी इंद्रिये विषयांकडे धाव घेतात. ममत्व आणि अहंकार या दोन दुर्गुणामुळे माणसाला विषयांची ओढ लागते. ममत्व म्हणजे अमुक एक माझं आहे आणि ते मला पाहिजे अशी त्या गोष्टीबद्दल ओढ वाटणं आणि अहंकार म्हणजे आपणच काय ते कर्तृत्ववान असा समज होऊन इतरांना तुच्छ लेखणं. आपण स्वत: कर्ते आहोत अशी माणसाची ठाम समजूत असते. माझ्या देहाच्या बळावर मी काय वाटेल ते करू शकतो असा त्याचा समज असतो पण प्रतिकूल वेळ आली की हा गप्प बसतो. अशावेळी ईश्वर कर्ता आहे हे त्याच्या तिव्रतेने लक्षात येते.

आपण सर्व कठपुतळ्या असून आपला सूत्रधार असलेल्या ईश्वराचा इच्छेनुसार तो आपल्याला नाचवत असतो. या दोन बाबी लक्षात घेतल्या की, ममत्व, आपलेपणाने आलेला स्वार्थ तसेच अहंकार आपोआप गळून पडतो. आपण वागतोय ते देवाला आवडेल की, नाही असा विचार प्रत्येक गोष्ट करताना तो करू लागतो. हा विचार एकदा मनात रुजला की, इंद्रिये नक्कीच आपल्या प्रारब्धानुसार मिळालेले भोग आनंदाने स्वीकारतील आणि अधिकचा हव्यास धरणार नाहीत. हा विचार मनात जसजसा पक्का होत जाईल तसतशा मनातील कामना नष्ट होतील व आहे त्यात समाधानी राहणं असा स्वभाव होऊन जाईल. या स्वभावात स्थिर झालेला मनुष्य स्वत:तल्या ईश्वराला जाणून घेऊ शकेल. स्वार्थ आणि अहंकार सुटणं ही सामान्य गोष्ट नव्हे, कारण यामध्ये मी पणाचा नाश होतो. असा मनुष्य शील व मुक्ती मिळवतो असं आपल्याला आपण सध्या अभ्यासत असलेल्या एवं ब्रह्मधियं भूप यो विजानाति दैवत । तुर्यामवस्थां प्राप्यापि जीवन्मुक्तिं प्रयास्यति ।। 69 ।। ह्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात सांगतायत. ज्या सुदैवी मनुष्याचा मीपणा गेलेला असतो तो दैवयोगाने ब्रह्मज्ञान जाणतो. त्याची अवस्था कशी असते ते पाहू. जेव्हा माणूस ठरवून इतर सर्व गोष्टीतून मन काढून घेतो व मनानं फक्त भगवंतांचा विचार करत असतो तेव्हा त्याची समाधी लागलेली असते. ही अवस्था काही क्षण, काही काळ किंवा काही दिवस टिकू शकते. याला ब्रह्मिभुत किंवा आत्मभुत अवस्था असं म्हणतात. ही अवस्था कायम टिकून राहिली की, त्याला आत्मसाक्षात्कार होत राहतो.

Advertisement

अर्थात अशी अवस्था साधणं हे येरागबाळ्याचं काम नव्हे हे नक्की! पण ही अवस्था अभ्यासाने व वैराग्याने साध्य होऊ शकते. या अवस्थेत स्वत:च्या अस्तित्वाची खात्री पूर्णपणे नाहीशी झालेली असल्याने ‘मीपण’ पूर्णपणे गेलेले असते. स्वप्न, झोप आणि जागृती या तीन व्यवहारातल्या अवस्था होत. त्यापेक्षा वेगळीच अशी ही एक चौथी अवस्था होय. तिला तुरीय अवस्था असं शास्त्रात म्हंटलं आहे. व्यक्त किंवा अव्यक्त सगुण ब्रह्माच्या उपासनेपासून ध्यानाने चढत जाऊन उपासक अखेरीस या अवस्थेस येऊन पोहोचतो. माणसानं अभ्यास करून ब्रह्मज्ञान मिळवावं आणि तुरीय अवस्था संपादन करावी असं भगवंत गीतेत सांगतात,

निरोधे जेथ चित्ताचा सर्व संचार संपला ।

जेथ भेटूनि आत्म्याते अंतरी तोषला स्वये ।। 6.20 ।।

नामरूपापलीकडच्या या अमृतत्वाचा अनुभव आल्यावर त्याचा जन्ममरणाचा फेरा आपोआपच चुकतो. कारण जन्ममरण तरी नामरूपातच येते आणि त्याच्यापलीकडे हा गेलेला असतो. याबाबत भगवंत गीतेत म्हणतात,

त्यास अक्षर हे नाम ती चि शेवटची गति ।

माझे परम ते धाम जेथूनि परते चि ना ।। 8.21 ।।

याप्रमाणे बाप्पानी जीवनामध्ये कसे वागत गेले तर मोक्ष मिळेल हे समजावून दिलेले असून जिवंतपणी मोक्ष मिळवणाऱ्या मनुष्याच्या जन्ममृत्यूचं चक्र संपुष्टात येतं आणि चालू असलेला जन्म संपला की, त्याला शेवटची गती मिळून तो परमधामी पोहोचतो.

श्रीगणेशगीता प्रथम अध्याय समाप्त

Advertisement
Tags :

.