For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पर्येचा ब्राह्मी शिलालेख

06:30 AM Jun 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
पर्येचा ब्राह्मी शिलालेख
Advertisement

एखाद्या प्रदेशाचा इतिहास समजून घेण्याच्या दृष्टीने तेथील मूर्ती, शिलालेख, ताम्रपट, ऐतिहासिक वास्तू, लोकपरंपरा महत्त्वाची भूमिका बजावत असतात. शिलालेखाद्वारे लिखित मजकूर अनंत काळापर्यंत टिकून रहावा म्हणून दगडावरती ठेवण्याची परंपरा जगभर अस्तित्वात असून, राजकीय, धार्मिक, सामाजिक आणि ऐतिहासिक माहिती जाणून घेण्याच्या दृष्टीने असे शिलालेख उपयुक्त ठरलेले आहेत. उत्तर प्रदेशातल्या अलाहाबाद येथील शिलालेख सम्राट गुप्त या इसवीसनाच्या चौथ्या शतकातल्या कारकिर्दीविषयीचे महत्त्वाचे पुराभिलेखीय साधन ठरलेला आहे. गुप्त राजघराण्यातील हा पहिलाच उपलब्ध कोरीव लेख असून, तो ब्राह्मी लिपीत आणि संस्कृत भाषेत कोरलेला आहे. दिग्विजयी ठरलेला समुद्र गुप्त, सम्राट चंद्रगुप्त पहिला आणि त्याची राणी कुमारदेवी यांचा पुत्र असल्याचे सदर शिलालेख स्पष्ट करीत आहे. तो योद्धा, राजकारण धुरंधर, गायन आणि वादन कलेत निपुण आणि कवितांची निर्मिती करीत असल्याचे समजते. सम्राट अशोकाच्या नावाचा स्पष्ट उल्लेख असलेला पहिला शिलालेख कर्नाटक राज्यातल्या मस्की या रायचूर जिल्ह्यातल्या गावात आढळलेला आहे. अशाच आशयाचा दुसरा शिलालेख मध्य प्रदेशातल्या दतिया जिल्ह्यात गुजर्रा येथे आढळलेला आहे. सम्राट अशोकचे शिलालेख अशोकस्तंभ, मोठ-मोठ्या गोलाकार खडकांवरती आणि गुहांमधील भिंतीवर कोरलेले आढळलेले आहेत.

Advertisement

आजच्या मराठी भाषेचा इतिहास हा किमान दोन हजार वर्षांहून अधिक जुना असल्याचे मानले जात असून, मराठीशी साधर्म्य दर्शविणारे अभिलेख इसवी सनाच्या सातव्या शतकापासून अस्तित्वात असल्याचे पुरावे सापडतात. त्यात अलिबाग जवळच्या आक्षीचा शिलालेख मराठी भाषेतील ज्ञात असलेला सर्वांत प्राचीन शिलालेख असल्याचे मानले जाते. सातवाहनकालीन नाणेघाटातील शिलालेखात वापरलेली भाषा ‘महाराष्ट्री प्राकृत’ असून लेखाची लिपी ब्राह्मी आहे आणि त्यामुळे नाणेघाटातला हा शिलालेख मराठीचा अभिजात वारसा स्पष्ट करतो. पश्चिम घाट व पश्चिम किनारपट्टी यांच्या कुशीत वसलेला गोवा शेकडो वर्षांपासून देश-विदेशातल्या व्यापारी, यात्रेकरू यांना आकर्षणबिंदू ठरलेला होता. युरोपियन सत्ताधीशांची सत्ता सर्वप्रथम भारतीय उपखंडात गोव्यात स्थापन झाली, ती सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात. त्यावरून राजकीयदृष्ट्या असलेले गोव्याचे महत्त्व स्पष्ट होत आहे.

कर्नाटक राज्यातला सगळ्यात प्राचीन शिलालेख हासन जिल्ह्यातल्या बेलूर शहरापासून काही अंतरावर असलेल्या हालमाडी गावात आढळलेला आहे. हा शिलालेख कन्नड लिपीतला असून, कदंब राजघराण्यातला नृपती काकूथ्सवर्मन याच्या राजवटीतला इसवी सन 450 चा आहे. कदंब राजा काकूथ्सवर्मनाच्या या शिलालेखातून प्रशासकीय भाषेच्या दृष्टीने कन्नडच्या होणाऱ्या वापरावर प्रकाशझोत पडलेला आहे. हालमाडी येथील शिलालेखापेक्षा जुना अभिलेख श्रवणबेळगोळ येथील चंद्रगिरी पर्वतावर पार्श्वनाथ बसदीवर आढळलेला असून, तो इसवी सनाच्या चौथ्या शतकातला आहे. परंतु त्यापेक्षा जुना शिलालेख शिवमोग्गाजवळच्या शिराळाकोप्पा येथील तालगुंडाच्या प्राणावेश्वर मंदिर संकुलात आढळलेला असून तो इसवी सन 370चा आहे. कन्नड भाषा आणि लिपीचा वापर प्रशासनात इतक्या जुन्या काळापासून होत असल्याची प्रचिती कर्नाटक आणि परिसरातल्या प्रदेशात आढळलेल्या जुन्या शिलालेखांवरून येते. पोर्तुगीज आमदानीत गोव्यातल्या जुन्या काबिजादीत येणाऱ्या तिसवाडी, बार्देश व सासष्टी या महालांतल्या धार्मिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक संचितांचा मोठ्या प्रमाणात विद्ध्वंस करण्यात आला. प

Advertisement

रंतु सांगे, सत्तरी, केपे, काणकोण, पेडणे, धारबांदोडा महालावरती शिवशाही आणि सौंदेकरांची सत्ता असल्याने आणि जेव्हा हे प्रदेश पोर्तुगीजांच्या सत्तेखाली आले, त्यावेळी धार्मिक समीक्षण बंद झाल्याकारणाने येथील काही शिलालेखांचे वाचन पुराभिलेख संशोधकांनी करण्यात यश लाभलेले आहे. सांगे येथील महामायेच्या मंदिरात आढळलेल्या सिंह राजाचा अभिलेख पाचव्या शतकातला असल्याचे मत त्याच्या संशोधनावरून इतिहासकारांनी मांडलेले आहे. उगे येथील महामायेच्या मंदिरातला अभिलेख राज्यातला जुना असल्याचे मानले जात होते. परंतु 1993 साली पर्ये-सत्तरीतल्या सातेरी देवीच्या अगदी जुन्या मंदिराच्या भग्नावशेषासमोरील उभ्या स्थितीत असलेल्या दगडावरती अक्षरे असल्याची बाब गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी त्यावेळचे पुराभिलेख खात्याचे संचालक डॉ. प्रकाशचंद्र शिरोडकर यांच्या निदर्शनास आणून दिले होते. एका उभ्या दगडावरती जी अक्षरे कोरली होती, ती तिसऱ्या अथवा चौथ्या इसवी सनाच्या शतकातली असल्याचे मत त्यावेळी त्यांनी धारवाड येथील कर्नाटक विद्यापीठातले संशोधक डॉ. श्रीनिवास रिट्टीचा दुजोरा देऊन मांडले होते. संस्कृत भाषा आणि ब्राह्मी लिपीतल्या या शिलालेखाचा नव्याने अभ्यास व संशोधन करण्याची गरज निर्माण झाली होती.

उडपी कर्नाटक येथील प्राचीन इतिहास आणि पुरातत्वशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक मुरुगेशी टी. यांनी पर्ये येथील महिषासूरमर्दिनीला सातेरीच्या रुपात पूजणाऱ्या भग्न मंदिराला भेट देऊन, तेथे उभ्या स्थितीत दगडावर कोरलेल्या अभिलेखाचे नव्याने संशोधन करण्याचा निर्णय घेतला. पोर्तुगीज पूर्वकाळापासून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतल्या प्रदेशाला जोडणारा जुना चोर्ला घाटमार्ग सांखळी-पर्येहून पुढे जात असल्याने पूर्वीच्या काळी हे मंदिर विशेष नावारुपाला आले होते. या मंदिराचा शेकडो वर्षांच्या इतिहास आणि सांस्कृतिक वारसा खरेतर 1993 साली प्रकाशात आला होता परंतु या दगडावरती कोरलेल्या शिलालेखातून काय अभिप्रेत होते, हे सांगण्याचा विशेष प्रयत्न प्रा. मुरुगेशी टी. यांनी त्याचे पुनर्वाचन नव्याने करून केलेला आहे. प्राचीन ते मध्ययुगीन कालखंडात गोव्यावरती भोज, बदामी, चालुक्य, कोकण शिलाहार, गोवा कदंब, राष्ट्रकुट या राजघराण्यांशिवाय अभिर, त्र्यैकुटक, बटपुरा, कलचुरी, विजयनगर आदींची सत्ता वेगवेगळ्या काळात प्रस्थापित झाली होती, याचे पुरावे आढळलेले आहेत.

परंतु मुरुगेशी टी. यांच्या नव्या संशोधनानुसार पर्ये येथील शिलालेखावरती दोन ओळींचा मजकूर असून त्यानुसार चौथ्या अथवा पाचव्या शतकात गोव्याच्या या प्रदेशावरती आजपर्यंतच्या इतिहासाला ज्ञात नसलेल्या हैहया राजघराण्याची ज्यावेळी सत्ता होती, तेव्हा हैहया घराण्याचा राजा धर्मा यज्ञो याने आपल्या सैन्यासह येथे यज्ञ केला होता आणि त्यावेळी या दगडाच्या रुपात येथे स्तंभ उभारला असावा, असे मत मांडलेले आहे. हैहया राजघराण्याचा पुराणात संदर्भ आढळत असून, प्राचीन काळातील वतीहोत्र शर्याता, भोज, अवंती व तुंडीकेरा वंशाचा समावेश हैहयात होत असल्याचे प्रतिपादन केलेले आहे. उत्तर व दक्षिणेकडील वेगवेगळ्या भागांवर हैहयांनी राज्य केले होते. चालुक्य, राष्ट्रकूट व कलिंगाच्या गंगा आणि वेंगीमधल्या बऱ्याच राजवंशाशी काही हैहरा राजपुत्र संबंधित असल्याचे संदर्भ आढळतात. हैहयाचा उल्लेख पर्येच्या शिलालेखात आढळल्याने, या प्रदेशाच्या इतिहासावर नवा प्रकाश पडलेला आहे.

- राजेंद्र पां. केरकर

Advertisement
Tags :

.