पाकविरुद्ध टी-20 मालिकेत किवींचे नेतृत्व ब्रेसवेलकडे
वृत्तसंस्था/ ख्राईस्टचर्च
पाकिस्तानविऊद्ध मायदेशी होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी मिच सँटनर उपलब्ध नसल्याने न्यूझीलंडचे नेतृत्व प्रमुख अष्टपैलू खेळाडूकडे सोपवण्यात आले आहे. रविवारी ख्राइस्टचर्चमध्ये सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत न्यूझीलंडचे नेतृत्व मायकल ब्रेसवेल करेल. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत त्याची कामगिरी इतरांपेक्षा जास्त उठावदार राहिली. आगामी घरच्या मैदानावरील मोहिमेसाठी ब्रेसवेलसोबत चॅम्पियन्स चषक स्पर्धेत खेळलेल्या इतर सहा खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
गेल्या वर्षी पाकिस्तानच्या दौऱ्यात मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठीच्या संघाचे नेतृत्व केल्यानंतर ब्रेसवेलला घरच्या मैदानावर आपल्या देशाचे नेतृत्व करण्याची पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. आपल्या देशाच्या संघाचे नेतृत्व करणे हा एक मोठा सन्मान आहे, असे ब्रेसवेलने म्हटले आहे. अलीकडच्या श्रीलंकेविरुद्धच्या मायदेशातील मालिकेत न खेळल्यानंतर ईश सोधी संघात परतला आहे तसेच बेन सीयर्स त्याच्या हॅमस्ट्रिंग दुखापतीनंतर परतला आहे. सदर दुखापतीमुळे तो अलीकडच्या चॅम्पियन्स ट्रॉफी मोहिमेतून बाहेर पडला होता.
संघ जलदगती गोलंदाजांवर जास्त ताण पडू नये याची काळजी घेत असल्याने मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी काइल जेमिसन आणि विल ओ’रोर्क उपलब्ध असतील. दुखापतीमुळे अंतिम फेरीत न खेळताही स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरलेल्या मॅट हेन्री याला चौथ्या आणि पाचव्या सामन्यासाठी निवडण्यात आले आहे. परंतु त्याची पुढे फिटनेस चाचणी घेतली जाईल. फिन अॅलन, जिमी नीशम आणि टिम सेफर्ट यांनाही संघात समाविष्ट करण्यात आले आहे.
न्यूझीलंड संघ-मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), फिन अॅलन, मार्क चॅपमन, जेकब डफी, झॅक फॉल्क्स (चौथा व पाचवा सामना), मिच हे, मॅट हेन्री (चौथा व पाचवा सामना), काइल जेमिसन (पहिला ते तिसरा सामना), डॅरिल मिशेल, जिमी नीशम, विल ओ’रोर्क (पहिला ते तिसरा सामना), टिम रॉबिन्सन, बेन सियर्स, टिम सेफर्ट, ईश सोधी.
टी-20 मालिकेचे वेळापत्रक : पहिला सामना : रविवार 16 मार्च, ख्राइस्टचर्च, दुसरा सामना : मंगळवार 18 मार्च, ड्युनेडिन, तिसरा सामना : शुक्रवार 21 मार्च, ऑकलंड, चौथा सामना : रविवार 23 मार्च, तौरंगा, पाचवा सामना : बुधवार 25 मार्च, वेलिंग्टन.