वळसंग पोलिसांकडून ४८ तासांत मुलाचा शोध
दक्षिण सोलापूर :
वळसंग पोलिसांनी ४८ तासांत हरवलेल्या तरुणाचा यशस्वी शोध लावून त्याला पालकांच्या ताब्यात देत एक मोठा दिलासा दिला. सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगले यांच्या नेतृत्वाखाली ही कार्यवाही करण्यात आली.
१४ जुलै रोजी होटगी येथील शुभम सुरेश फुलारी (वय ३०) हा कोणालाही न सांगता घरातून निघून गेला. दुसऱ्या दिवशी, १५ जुलै रोजी, त्याच्या आई-वडिलांनी बेपत्ता झाल्याची तक्रार वळसंग पोलिसांकडे दाखल केली. घरगुती तणावामुळे तो घरातून निघून गेला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र काहीतरी गंभीर प्रकार घडला असावा, अशी भीतीही निर्माण झाली होती.
घटनेचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगले यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने तपास यंत्रणा सक्रिय करण्यात आली. सोशल मीडियाचा वापर करून विविध ठिकाणी संपर्क साधण्यात आला. शुभमचा मोबाईल फोन बंद असल्याने शोधमोहीम अधिक कठीण झाली.
मात्र अखेर तपासातून माहिती मिळाली की शुभम मुंबईत असल्याची शक्यता आहे. त्या दिशेने तपास करून पोलीस पथकाने त्याला शोधून काढले व ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला सुखरूप आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले.
मुलगा सापडल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी पोलीस निरीक्षक अनिल सनगले यांचा पेढे भरवून सत्कार केला आणि आपल्या भावना व्यक्त केल्या.
- ...आणि सुटकेचा निश्वास!
वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील होटगी गावातील तरुण बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलीस अधिकारी विलास यामावार, प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास यंत्रणा सक्रिय करण्यात आली. मित्रांकडून माहिती घेत विविध ठिकाणी चौकशी करण्यात आली. काही तासांतच शुभमला शोधून त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात यश आले.
-अनिल सनगलेसहाय्यक पोलीस निरीक्षक, वळसंग पोलीस ठाणे