बॉक्सिंग स्पर्धा आजपासून
भारतीय बॉक्सर्सपुढे कठीण आव्हान
वृत्तसंस्था/ पॅरिस
ऑलिम्पिकमधील बॉक्सिंग स्पर्धा आज शनिवारपासून सुरू होत असून जागतिक स्पर्धेतील पदकविजेत्या निखत झरीन, लवलिना बोर्गोहेन आणि निशांत देव हे कठीण ड्रॉमधून मार्ग काढून बॉक्सिंगमध्ये भारताची सर्वोत्तम ऑलिम्पिक कामगिरी करण्याचा प्रयत्न करतील.
ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॉक्सर्सनी आतापर्यंत तीन पदके जिंकली असून सर्व कांस्य आहेत. 2008 च्या बीजिंग गेम्समध्ये विजेंदर सिंग हा एकमेव पदकविजेता बॉक्सर राहिला, तर मेरी कॉम (लंडन, 2012) आणि बोर्गोहेन (टोकियो, 2021) या महिला स्टार्सनी नंतर त्यात भर घातली. पॅरिसमध्ये सहभागी झालेल्या सहा बॉक्सर्सना गुऊवारी चुरशीचे ते कठीण असा ड्रॉ वाट्याला आला आहे. या गटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत आणि त्यात दोन वेळची जगज्जेती झरीन आघाडीवर आहे.
लाइट-फ्लायवेट (50 किलो) विभागात तीन प्रमुख पदक दावेदार असून चीनची वू यू, थायलंडची चुथामात रक्सत आणि उझबेकिस्तानची सबिना बोबोकुलोव्हा यांचे आव्हान या 28 वर्षीय तऊणीला पेलावे लागणार आहे. झरीन रविवारी जर्मनीच्या मॅक्सी क्लोत्झरविऊद्ध मोहिमेची सुऊवात करेल. त्यानंतर ती आशियाई क्रीडा स्पर्धेतील अव्वल मानांकित आणि फ्लायवेट वर्ल्ड चॅम्पियन वूचा सामना करेल. झरीनने हा अडथळा पार केला, तर तिची आठव्या मानांकित आणि आशियाई क्रीडास्पर्धेत रौप्यपदक विजेती रक्सत किंवा बोबोकुलोव्हा यापैकी एकाशी गाठ पडेल. दुसरीकडे, अनुभवी अमित पंघलला (51 किलो) पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली आहे आणि तो आफ्रिकन गेम्स चॅम्पियन झांबियाचा पॅट्रिक चिनयेम्बा याचा सामना करेल.
प्रतिभावान निशांतला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली असून गुऊवारी प्री-क्वॉर्टरमध्ये इक्वेडोरच्या रॉड्रिग्ज टेनोरिओशी त्याची लढत होईल, तर बोर्गोहेनची पहिल्या फेरीत नॉर्वेच्या सुनिव्हा हॉफस्टॅडशी लढत होईल. आशियाई क्रीडास्पर्धेतील कांस्यपदक विजेती प्रीती पवार (54 किलो) तिच्या पदार्पणाच्या खेळात पहिल्या फेरीत व्हिएतनामच्या वो थी किम आन्हशी झुंज देईल. एक विजय तिला 16 खेळाडूंच्या फेरीत घेऊन जाईल. आणखी एक नवोदित जस्मिन लम्बोरिया हिला मात्र सर्वांत कठीण ड्रॉ मिळाला आहे.