बॉक्सर निशांत देवचा विजयी प्रारंभ विश्व
मुष्टियुद्ध ऑलिम्पिक पहिली पात्रता स्पर्धा : शिवा थापा पराभूत
वृत्तसंस्था/ बुस्टो अर्सिझिओ, इटली
वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्य मिळविलेल्या निशांत देवने येथे सुरू असलेल्या पहिल्या ऑलिम्पिक पात्रता बॉक्सिंग स्पर्धेत विजयी सुरुवात करताना त्याने ब्रिटनच्या मुष्टियोद्ध्यावर मात केली. मात्र अनुभवी शिवा थापाला पराभवाला सामोरे जावे लागले.
पुरुषांच्या 71 किलो वजन गटात खेळणारा निशांत देवने या लढतीत स्थिरावण्यास फार वेळ घेतला नाही. त्याने राष्ट्रकुल कांस्यविजेत्या लेविस रिचर्डसनवर आक्रमक ठोसेबाजी करीत पहिली फेरी 4-1 अशी जिंकली. 23 वर्षीय निशांद दुसऱ्या फेरीत जास्त आक्रमक झाला. लांब हातांचा उपयोग करीत उजव्या हाताने प्रभावीपणे हुकचे ठोसे लगावत 5-0 अशी ही फेरी जिंकली. तिसऱ्या फेरीत त्याने नियंत्रित खेळ करताना रिचर्डसनचे फटके अचूकपणे हुकवताना गुणावर लक्ष ठेवले होते. या फेरीत विभागून निर्णय मिळाल्याने निशांतने ही लढत 4-1 अशा फरकाने जिंकत आगेकूच केली.
सहा वेळा आशियाई चॅम्पियनशिपमध्ये पदके पटकावणाऱ्या अनुभवी शिवा थापाला मात्र 63.5 किलो वजन गटाच्या लढतीत विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन उझ्बेकच्या रुसलान अब्दुल्लाएव्हकडून पराभव स्वीकारावा लागला. रुसलानने अचूक ठोसेबाजी करीत शिवाचा बचाव भेदत गुण मिळविले. त्याच्या आक्रमकतेपुढे शिवा प्रारंभापासूनच बचावात्मक खेळत होता. रुसलानने आक्रमण कायम राखल्यानंतर पंचांनी पहिल्या फेरीतच ही लढत थांबवली.
राष्ट्रीय चॅम्पियन लक्ष्य चहर (80 किलो) इराणच्या घेशलाघी मेसामकडून पराभूत झाला तर महिलांमध्ये जस्मिन लंबोरिया पहिल्याच लढतीत पराभूत झाली. रात्री उशिरा युवा वर्ल्ड चॅम्पियन अंकुशिता बोरो (66 किलो) हिची लढत फ्रान्सच्या सनविको एमिलीशी होईल तर राष्ट्रीय चॅम्पियन संजीतची (92 किलो) कझाकच्या ऐबेक ओरलबेशी होईल.
या पहिल्या वर्ल्ड ऑलिम्पिक क्वालिफायर स्पर्धेत 590 हून अधिक बॉक्सर्सनी भाग घेतला असून 49 ऑलिम्पिक कोटा मिळणार आहेत. त्यापैकी 28 पुरुषांसाठी व 21 महिलांसाठी आहेत. 45 ते 51 बॉक्सर्स दुसऱ्या वर्ल्ड ऑलिम्पिक क्वालिफायरसाठी पात्र ठरणार आहेत. ही स्पर्धा 23 मे ते 3 जून या कालावधीत बँकॉकमध्ये होणार आहे. भारताने आतापर्यंत चार ऑलिम्पिक कोटा मिळविले आहेत. निखत झरीन (50 किलो), प्रीती (54 किलो), परवीन हुडा (57 किलो), लवलिना बोर्गोहेन (75 किलो) यांनी ऑलिम्पिक पात्रता मिळविली आहे.