बॉक्सर लवलिना उपांत्यपूर्व फेरीत
तिरंदाज दीपिका कुमारीची आगेकूच : टेबल टेनिसपटू श्रीजा अकुलाचाही विजयी धडाका
वृत्तसंस्था/ पॅरिस
भारताची स्टार बॉक्सर लवलिना बोर्गोहेन, तिरंदाज दीपिका कुमारी व युवा टेबल टेनिसपटू श्रीजा अकुला यांनी पॅरिस ऑलिम्पिकच्या पाचव्या दिवशी आपला विजयी धडाका कायम ठेवला. महिलांच्या 75 किलो गटात लवलिनाने तर तिरंदाजी दीपिका कुमारीनेही उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
महिलांच्या 75 किलो गटाच्या 16 च्या फेरीत लवलानाने नॉर्वेच्या सुनिवा हॉफस्टॅडचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला. या विजयासह तिने उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. आता तिचा पुढील फेरीत सामना जागतिक क्रमवारीत नंबर 1 चीनच्या ली कियानशी होईल. सुरुवातीपासून आक्रमक खेळणाऱ्या लवलाना प्रतिस्पर्धी सुनिवाला जराही वरचढ होण्याची संधी दिली नाही. तिने हा गेम सहज जिंकला. ऑलिम्पिकमधील दुसरे पदक जिंकण्यापासून लवलिना आता एक विजय दूर आहे. उपांत्यपूर्व फेरीत दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या चीनच्या ली कियानचे कडवे आव्हान असेल. आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या 75 किलो गटाच्या अंतिम फेरीत तिला कियानविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. यामुळे या लढतीत लवलिना मागील पराभवाचा वचपा घेण्यासाठी प्रयत्नशील असेल. लवलिना आणि कियान यांच्यातील सामना 4 ऑगस्टला होणार आहे.
तिरंदाज दीपिका उपउपांत्यपूर्व फेरीत
अनुभवी तिरंदाज दीपिका कुमारीने महिला तिरंदाजीच्या वैयक्तिक प्रकारात उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. जिथे दीपिकाचा सामना 3 ऑगस्टला जर्मनीच्या मिशेल क्रॉपनशी होणार आहे. दीपिकाने राउंड ऑफ 32 मध्ये नेदरलँडच्या क्विंटी रोफेनचा 6-2 असा पराभव केला. तिने पहिला सेट 29-28 असा जिंकला. त्यानंतर तिने दुसरा सेट 27-29 असा गमावला. यानंतर दीपिकाने जोरदार पुनरागमन करत 25-17 आणि 28-23 असे सलग दोन सेट जिंकले.
टेबल टेनिसमध्ये श्रीजा अकुलाची ऐतिहासिक कामगिरी
ऑलिम्पिकमध्ये पाचव्या दिवशी टेबल टेनिसपटू श्रीजा अकुलाने इतिहास रचला आहे. बुधवारी झालेल्या सामन्यात विजय मिळवत तिने टेबल टेनिसच्या राऊंड 16 मध्ये प्रवेश केला आहे. असा कारनामा करणारी ती मनिका बात्रानंतर दुसरी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. तिने सिंगापूरच्या जिआन जेंगचा 9-11, 12-10, 11-4, 11-5, 10-12, 12-10 असा पराभव केला. विशेष म्हणजे, तिने हा पराक्रम आपल्या वाढदिनी केला आहे. तिचा 31 जुलै रोजी म्हणजेच बुधवारी 26 वा वाढदिवस होता. आता, तिचा पुढील फेरीत सामना यिंग्सा सिनविरुद्ध होणार आहे.