11 बळींसह दुसरा दिवस गाजविला गोलंदाजांनी
पाक-द.आफ्रिका पहिली कसोटी : आगाचे शतक हुकले, मुथुसॅमीचे 6 बळी, रिकेल्टन, झोर्जी यांची अर्धशतके
वृत्तसंस्था / द.आफ्रिका
येथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत सोमवारी खेळाचा दुसरा दिवस गोलंदाजांनी गाजविला. दिवसभरात एकूण 11 गडी बाद झाले. मुथुसॅमीने 117 धावांत 6 बळी मिळविल्याने पाकचा पहिला डाव 378 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर दिवसअखेर द.आफ्रिकेने पहिल्या डावात 6 बाद 216 धावा जमविल्या. रिकेल्टन आणि झोर्जी यांनी अर्धशतके झळकविली. पाकच्या नौमन अलीने 4 गडी बाद केले.
दोन सामन्यांच्या या कसोटी मालिकेतील दुसऱ्या दिवशी पाकने 5 बाद 313 या धावसंख्येवरुन खेळाला पुढे सुरूवात केली आणि त्यांचे शेवटचे पाच गडी 65 धावांत बाद झाले. सलमान आगाने 145 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांसह 93 तर मोहम्मद रिझवानने 140 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 75 धावा झळकविल्या. या जोडीने सहाव्या गड्यासाठी 136 धावांची शतकी भागिदारी केली. खेळ सुरू झाल्यानंतर मुथुसॅमीने रिझवानला झेलबाद केले. त्याने आपल्या कालच्या 62 धावांमध्ये केवळ 13 धावांची भर घातली. सलमान आगाने एका बाजूने चिवट फलंदाजी करत संघाच्या धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला. तो शेवटच्या गड्याच्या रुपात बाद झाला. आगाचे शतक 7 धावांनी हुकले. द.आफ्रिकेच्या मुथुसॅमीने 117 धावांत 6 तर सुब्रायनने 2 तसेच रबाडा आणि हार्मेर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. उपाहारापूर्वी पाकचा पहिला डाव संपुष्टात आला. खेळाच्या पहिल्या सत्राअखेर द.आफ्रिकेने बिनबाद 10 धावा जमविल्या होत्या.
खेळाच्या दुसऱ्या सत्राला प्रारंभ झाला आणि चहापानापर्यंत द.आफ्रिकेने 34 षटकात 2 बाद 112 धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार मार्करम नौमन अलीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 1 चौकारासह 20 धावा केल्या. नौमन अलीने मुल्डेरला झेल बाद केले. त्याने 3 चौकारांसह 17 धावा जमविल्या. रिकेल्टन आणि झोर्जी या जोडीने द.आफ्रिकेचा डाव सावरताना तिसऱ्या गड्यासाठी 94 धावांची भागिदारी केली. चहापानानंतर रिकेल्टनने 8 चौकारांसह आपले अर्धशतक पूर्ण केले तर झोर्जीने 63 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने अर्धशतक झळकविले. सलमान आगाने रिकेल्टनला बाबर आझमकरवी झेलबाद केले. त्याने 137 चेंडूत 2 षटकार आणि 9 चौकारांसह 71 धावा जमविल्या. स्टब्ज केवळ 8 धावांवर तंबूत परतला तर ब्रेव्हीसला खातेही उघडता आले नाही. नौमन अलीने व्हेरेनीला 2 धावांवर पायचीत केले. झोर्जी दिवसअखेर 1 षटकार आणि 9 चौकारांसह 81 धावांवर तर मुथुसॅमी 6 धावांवर खेळत होते. पाकतर्फे नौमन अलीने 85 धावांत 4 तर सलमान आगा आणि साजीद खान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. द.आफ्रिकेचा संघ अद्याप 162 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे चार गडी खेळावयाचे आहेत.
संक्षिप्त धावफलक पाक प. डाव 110.4 षटकात सर्वबाद 378 (इमामुल हक 93, सलमान आगा 93, शान मसूद 76, मोहम्मद रिझवान 75, बाबर आझम 23, मुथुसॅमी 6-117, सुब्रायन 2-78, रबाडा, हार्मेर प्रत्येकी 1 बळी), द.आफ्रिका प. डाव 67 षटकात 6 बाद 216 (रिकेल्टन 71, झोर्जी खेळत आहे 81, मार्करम 20, मुल्डेर 17, अवांतर 11, नौमन अली 4-85, सलमान आगा व साजीद खान प्रत्येकी 1 बळी).