For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केपटाऊनमध्ये पहिल्याच दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व

06:24 AM Jan 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
केपटाऊनमध्ये पहिल्याच दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व
Advertisement

दोन्ही संघ ऑलआऊट : एकूण 23 बळी, आफ्रिकेचा 55 धावात खुर्दा : सिराजचे 15 धावांत 6 बळी 

Advertisement

टीम इंडियाही 153 धावांत गारद : रबाडा, एन्गिडी, बर्गरचे प्रत्येकी 3 बळी

वृत्तसंस्था/ केपटाऊन

Advertisement

येथे सुरु असलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील दुसऱ्या कसोटी सामन्यात ‘न भूतो न भविष्यती‘ अशी परिस्थिती पाहायला मिळाली. सुरुवातीला मोहम्मद सिराजच्या (15 धावांत 6 बळी) भेदक माऱ्यासमोर यजमान दक्षिण आफ्रिकेचा पहिल्या डावात 23.2 षटकांत 55 धावांत फडशा पडला. पहिल्या सत्रात आफ्रिकन संघाच्या दांड्या गुल करून सामन्यावर वर्चस्व मिळवलेला भारतीय संघही एखाद्या पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. अवघ्या 9 मिनिटे आणि 8 चेंडूत 6 विकेट्स गमावत भारताचा डाव 153 धावांत आटोपल्याने 98 धावांची आघाडी भारतीय संघाला मिळाली. यानंतर दुसऱ्या डावात आफ्रिकेने 17 षटकांत 3 गडी गमावत 62 धावा केल्या होत्या. यजमान संघ अद्याप 36 धावांनी पिछाडीवर आहे. 

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गारने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र भारतीय गोलंदाजांसमोर आफ्रिकेच्या फलंदाजांची तंबूत परतण्याची लाईन लागली. पहिल्या कसोटीत डावाने पराभव स्वीकारल्यानंतर दुसऱ्या कसोटीत मात्र टीम इंडियाने जोरदार पलटवार केला. आफ्रिकन फलंदाजांना एक एक धाव काढण्यासाठी भारतीय गोलदाजांनी चांगलेच झगडण्यास भाग पाडले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील आफ्रिकेची ही भारताविरुद्ध सर्वात निचांकी धावसंख्या आहे. यापूर्वी आफ्रिकेने नोव्हेंबर 2015 मध्ये भारताविरुद्ध सर्वात कमी धावसंख्या केली होती. त्यावेळी आफ्रिकन संघ नागपूर कसोटीत 79 धावांत गारद झाला होता.

एकटा सिराज पुरुन उरला

केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर प्रथम फलंदाजीसाठी उतरल्यानंतर तिसऱ्याच षटकात मार्करमला सिराजने 2 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर पुढील षटकात त्याने कर्णधार एल्गारच्या (4) दांड्या उडवत त्याने आपली झलक दाखवून दिली. टोनी झोर्झी (2) व ट्रिस्टन स्टब्ज (3) यांनी देखील सपशेल निराशा केली. झोर्झीने यष्टीरक्षक केएल राहुलच्या हातात झेल दिला. चौथ्या क्रमांकावरील ट्रिस्टन स्टब्स बुमराहच्या गोलंदाजीवर माघारी परतला. आफ्रिकेचे दोनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. काइल व्हेरेनने 15 आणि डेव्हिड बेडिंगहॅमने 12 धावांचे योगदान दिले. याशिवाय अन्य एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. मार्को जॅन्सेन (0), केशव महाराज (3), रबाडा (5), नांद्रे बर्गर (4) यांनीही सपशेल निराशा केल्याने आफ्रिकेचा डाव अवघ्या 23.2 षटकांत 55 धावांवर आटोपला. भारताकडून सिराजने 15 धावांत 6, बुमराहने 25 धावांत 2 तर मुकेश कुमारने 2 गडी बाद केले.

टीम इंडिया ऑल आऊट 153

आफ्रिकेला 55 धावांत ऑलआऊट केल्यानंतर टीम इंडियाचीही खराब सुरुवात झाली. सलामीवीर यशस्वी जैस्वाल या सामन्यातही अपयशी ठरला. रबाडाने त्याला भोपळाही फोडू दिला नाही. कर्णधार रोहित शर्माने मात्र 50 चेंडूत 7 चौकारासह 39 तर शुबमन गिलने 5 चौकारासह 36 धावांचे योगदान दिले. रोहित व शुबमनला बर्गरने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. अनुभवी राहुलही फारसा चमत्कार दाखवू शकला नाही. 8 धावा काढून तो बाद झाला. केएल राहुल बाद झाला तेव्हा भारतीय संघाची अवस्था 153 धावांवर 4 बाद अशी होती. त्यानंतर मात्र भारताचा आलेला प्रत्येक खेळाडू फक्त हजेरी लावून बाद होत राहिला. 153-4 वरून भारतीय संघ पुढील 8 चेंडूत आणि 9 मिनिटात 34.5 षटकांत 153 धावांवर सर्वबाद झाला. विराट कोहलीने सर्वाधिक 59 चेंडूत 6 चौकार व 1 षटकारासह 46 धावा केल्या. आफ्रिकेकडून रबाडा, एन्गिडी व बर्गरने प्रत्येकी तीन गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक : द.आफ्रिका 23.2 षटकांत सर्वबाद 55 (काइल व्हेरेन,  15, बेडिंगहॅम 12, सिराज 15 धावांत 6 बळी, बुमराह व मुकेश कुमार प्रत्येकी दोन बळी).

भारत 34.5 षटकांत सर्वबाद 153 (रोहित शर्मा 39, शुबमन गिल 36, विराट कोहली 46, केएल राहुल 8, रबाडा, एन्गिडी, बर्गर प्रत्येकी तीन बळी).

द.आफ्रिका दुसरा डाव 17 षटकांत 3 बाद 62 (मार्करम खेळत आहे 36, एल्गार 12, बेडिंगहॅम खेळत आहे 7, मुकेश कुमार 2 तर बुमराह 1 बळी).

कसोटी क्रिकेटमध्ये आफ्रिकेचे खराब प्रदर्शन, आतापर्यंतची निचांकी धावसंख्या

दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताविरुद्धच्या पहिल्या डावात अवघ्या 55 धावांत सर्वबाद झाला. 55 धावांसह आफ्रिकेने भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटच्या एका डावात सर्वात कमी धावसंख्या करण्याचा लाजिरवाणा विक्रम केला. याआधी न्यूझीलंडच्या नावावर भारताविरुद्ध कसोटीत सर्वात कमी धावसंख्येचा लज्जास्पद विक्रम होता. 2021 मध्ये वानखेडेवर किवी संघ भारतीय संघाविरुद्ध 62 धावांत ऑलआऊट झाला होता. पण दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर 55 धावांवर ऑलआऊट होऊन हा नकोसा विक्रम आपल्या नावावर केला आहे. विशेष म्हणजे 2008 मध्ये भारताचा डाव आफ्रिकेने 76 धावांत गुंडाळला होता. त्याचीच आज परतफेड करत भारताने 55 धावात खेळ खल्लास केला. याशिवाय, अलीकडील काळातील आफ्रिकेची ही सर्वात निचांकी धावसंख्या ठरली आहे.

आफ्रिकेची भारताविरुद्ध सर्वात कमी कसोटीमधील धावसंख्या

  1. 55 धावा - केपटाऊन कसोटी, 2023
  2. 76 धावा - नागपूर कसोटी, 2015
  3. 84 धावा - जोहान्सबर्ग कसोटी, 2006

सिराजची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी

मोहम्मद सिराजने पहिल्याच सत्रात 5 बळी घेत इतिहास रचला आहे.  वास्तविक, सिराज भारतासाठी सर्वात कमी धावा देऊन 5 विकेट घेण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. पहिल्या नंबरवर जसप्रीत बुमराह आहे. बुमराहने 2019 साली वेस्ट इंडिजविरुद्ध 7 धावांत 5 फलंदाज बाद केले होते. आता सिराज या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. केपटाऊनमध्ये  सिराजने 15 धावांत 6 खेळाडू बाद केले. बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्यानंतर भारताचा माजी दिग्गज गोलंदाज जवागल श्रीनाथ तिसऱ्या क्रमांकावर आहे. जवागल श्रीनाथने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 21 धावांत 6 बळी घेतले होते. श्रीनाथने ही कामगिरी 1996 मध्ये केली होती.

टीम इंडियाचा लाजिरवाणा विक्रम

चांगल्या सुरुवातीनंतर मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केल्यामुळे टीम इंडियाचा पहिला डाव 153 धावांवर आटोपला. विशेष म्हणजे, भारताचे सहा फलंदाज शून्यावर बाद झाले. अशी कामगिरी भारताकडून दोनदा झाली. कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात 6 फलंदाज शून्यावर बाद होण्याची ही एकूण आठवी वेळ आहे, ही नकोशी कामगिरी बुधवारी भारताने केली. सर्वप्रथम अशी कामगिरी पाकिस्तानने केली आहे. 1980 मध्ये वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात पाकिस्तानचे सहा फलंदाज शुन्यावर बाद झाले होते. त्यानंतर 1996 मध्ये श्रीलंका, 2002 मध्ये बांगलादेश, 2014 मध्ये भारत, 2018 मध्ये न्यूझीलंड, आणि 2022 मध्ये बांगलादेशने दोन कसोटी सामन्यांमध्ये अशी निराशाजनक खेळी केली होती. त्यानंतर थेट 2024 च्या पहिल्याच आठवड्यात भारताच्या नावावर हा नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे.

Advertisement
Tags :

.