महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गयानाच्या खेळपट्टीवर गोलंदाजांचे वर्चस्व, 3 दिवसात 40 विकेट्स

06:58 AM Aug 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा विंडीजवर 40 धावांनी विजय :  विआन मुल्डर सामनावीर तर केशव महाराज मालिकावीर

Advertisement

वृत्तसंस्था/ गयाना, वेस्ट इंडिज

Advertisement

वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 40 धावांनी विजय मिळवला. या विजयासह आफ्रिकेने दोन सामन्यांची मालिका 1-0 अशा फरकाने जिंकली. मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत राहिला होता, तर दुसऱ्या सामन्यात आफ्रिकेने पुनरागमन करत यजमान विंडीजवर शानदार विजय मिळवला. विशेष म्हणजे, आफ्रिकन क्रिकेट संघाने विंडीजविरुद्ध मागील 32 वर्षांची अपराजित मालिका कायम राखली आहे. याशिवाय, आफ्रिकेने सलग 10 कसोटी मालिकामध्ये विंडीजवर विजय मिळवला आहे.

गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेला द. आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात 160 धावांत गारद झाला. यानंतर पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या वेस्ट इंडिजचा डाव 144 धावांवर आटोपला. दोन्ही संघांच्या पहिल्या डावात गोलंदाजांचे वर्चस्व राहिले. दुसऱ्या डावात आफ्रिकेचा संघ 246 धावांत सर्वबाद झाला आणि वेस्ट इंडिजला विजयासाठी 263 धावांचे लक्ष्य दिले. विजयी आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजचा संघ 66.2 षटकांत 222 धावांवर ऑलआऊट झाला. मालिकेत 13 बळी घेणाऱ्या फिरकीपटू केशव महाराजला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला तर सामन्यात 6 बळी व 34 धावांची खेळी साकारणाऱ्या विआन मुल्डरला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

गयानाच्या खेळपट्टीवर गोलंदाजांचा कहर

प्रारंभी, आफ्रिकेने तिसऱ्या दिवशी 5 बाद 223 धावसंख्येवरुन तिसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात केली. पण, पहिल्या सत्रातच अवघ्या 23 धावांची भर घातल्यानंतर पाहुण्या आफ्रिकन संघाचा डाव 80.4 षटकांत 246 धावांवर आटोपला. आफ्रिकेकडून काईल व्हेरेनने सर्वाधिक 59 धावांचे योगदान दिले तर विआन मुल्डरने 34 धावा फटकावल्या. याशिवाय, कर्णधार अॅडम मॅरक्रमने 51 तर टोनी डी जोर्झीने 39 धावा केल्या. इतर आफ्रिकन फलंदाजांनी मात्र विंडीजच्या गोलंदाजासमोर सपशेल शरणागती पत्कारली. विंडीजकडून जीडेन सील्सने सर्वाधिक 61 धावांत 6 बळी घेतले तर गुडाकेश मोती व वॉरिकन यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.

आफ्रिकेने विजयासाठी दिलेल्या 263 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीज फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली. सलामीवीर मायकेल लुईस पाचव्या षटकांत बाद झाला तर कर्णधार क्रेग ब्रेथवेटलाही फारशी चमक दाखवता आली नाही. यानंतर लागोपाठ विकेट गेल्याने विंडीजची 6 बाद 104 अशी स्थिती झाली होती. गुडाकेश मोतीने 45 धावा करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. केशव महाराजने तळाच्या फलंदाजांना झटपट बाद करत विंडीजला 222 धावांवर गुंडाळले. आफ्रिकेकडून वेगवान गोलंदाज रबाडा आणि फिरकी गोलंदाज केशव महाराज यांनी प्रत्येकी 3 विकेट्स तर विआन मुल्डर आणि डॅन पिएड यांनी 2-2 विकेट्स घेतल्या.

संक्षिप्त धावफलक

द.आफ्रिका प.डाव 160 व दुसरा डाव 246

वेस्ट इंडिज प.डाव 144 व दुसरा डाव 66.2 षटकांत सर्वबाद 222 (क्रेग ब्रेथवेट 25, कावीम हॉज 29, जोशुआ डी सिल्वा 27, गुडाकेश मोती 45, वॉरिकन नाबाद 25, रबाडा व केशव महाराज प्रत्येकी तीन बळी).

फिरकीपटू केशव महाराजची ऐतिहासिक कामगिरी

आफ्रिकन फिरकीपटू गोलंदाज केशव महाराजने विंडीजविरुद्ध लढतीत ऐतिहासिक कामगिरी केली. या कसोटीत त्याने 6 बळी घेत आफ्रिकेचा सर्वात यशस्वी फिरकी गोलंदाज बनण्याचा विक्रम केला. महाराज आता आफ्रिकेकडून सर्वाधिक बळी घेणारा फिरकी गोलंदाज बनला आहे. महाराजने कसोटी कारकिर्दीत 52 सामन्यांत 171 बळी घेतले आहेत. ही कामगिरी करताना त्याने आफ्रिकेच्या ह्यू टेफिल्डचा विक्रम मोडला. त्यांनी 37 सामन्यात 170 बळी घेतले होते.

कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत टीम इंडिया अव्वलस्थानी कायम

विंडीजविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह द. आफ्रिकेने पाकिस्तानला मागे टाकत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत पाचवे स्थान पटकावले आहे. आफ्रिकेने 2024-25 च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या सर्कलमध्ये आतापर्यंत 6 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्यांनी 2 सामने जिंकले तर 3 गमावले आणि 1 अनिर्णित राहिला. तर पाकिस्तानने आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत, ज्यात 2 जिंकले आणि 3 हरले. गुणतालिकेत भारतीय संघ पहिल्या स्थानी असून ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंड तिसऱ्या, श्रीलंका चौथ्या तर आफ्रिका पाचव्या, पाकिस्तान सहाव्या तर इंग्लंड सातव्या स्थानी आहे.

आफ्रिकेचा सलग 10 वा कसोटी मालिकाविजय

विंडीजविरुद्ध दुसरी कसोटी जिंकत दक्षिण आफ्रिकेने मागील 32 वर्षांची अपराजित मालिका कायम राखली आहे. 1992 मध्ये रिची रिचर्डसनच्या नेतृत्वात विंडीजने आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका जिंकली होती, यानंतर मात्र आतापर्यंत आफ्रिकेने दहा कसोटी मालिका विजय मिळवले आहेत. विंडीजला 32 वर्षात आफ्रिकेविरुद्ध एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article