बोवेसचा सर्वात जलद द्विशतक नोंदवण्याचा विक्रम
लिस्ट ए सामन्यात 103 चेंडूत फटकावली डबल सेंच्युरी
वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
न्यूझीलंडचा स्फोटक सलामीवीर चॅड बोवेसने लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वांत वेगवान द्विशतक नेंदवण्याचा विक्रम केला. त्याने केवळ 103 चेंडूत द्विशतक नोंदवताना भारताच्या नारायण जगदीशनचा व ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडचा विक्रम मागे टाकला.
बोवेसने कँटरबरीकडून ओटॅगोविरुद्ध फोर्ड ट्रॉफीत खेळताना हा विक्रम नोंदवता 50 षटकांच्या सामन्यातील विक्रम मागे टाकला. तो अखेर 110 चेंडूत 205 धावा काढून बाद झाला. जगदीशन व हेड यांनी 114 चेंडूत द्विशतकी मजल मारली होती. जगदीशनने 2022 मध्ये हजारे चषक स्पर्धेत तर हेडने मार्श कप स्पर्धेत 2021-22 मध्ये दक्षिण ऑस्ट्रेलियाकडून खेळताना केला होता. बोवेसने 53 चेंडूत शतकी मजल मारली. पण त्याला 49 चेंडूत शतक नेंदवण्याचा रॉस टेलरचा विक्रम मोडता आला नाही. त्याने 100 व्या लिस्ट ए सामन्यात 27 चौकार व 7 षटकारांची आतषबाजी करीत कँटरबरी संघाला 9 बाद 342 धावांची मजल मारून दिली. त्यानंतर ओटॅगोचा 103 धावांत गुंडाळून 240 धावांची विजय मिळविला.