आनंद आणि भीतीही
मे महिना सुरु आहे, रब्बी पिकांची काढणी आणि खरीप हंगामाची तयारी असा हा काळ असतो. ऊन मी म्हणत असते आणि वळीवाची एखादी सर सुखावत असते पण यावर्षी सारे उलटे पालटे झाले आहे आणि जे अंदाज, वार्ता येत आहेत, त्यामुळे खरे तर आनंद व्हायला हवा पण या वार्तांनी धडकी भरावी अशी स्थिती निर्माण झाली आहे. राज्यात गेले आठ दिवस मान्सूनपूर्व पावसाने विजांच्या कडकडाटात बरसायला सुरवात केली आहे, बरसणे हा शब्द अयोग्य ठरावा आणि कोसळणे बरोबर व्हावा अशी स्थिती आहे. त्यामुळे यंदा आक्रित घडले आहे. यंदाचा मे महिना पावसाळी ठरला आहे. पाऊस धुवांधार कोसळत आहे. पाणीटंचाई, टॅंकर, चारा छावण्या, विक्रमी तापमान, उष्माघात असे विषय मागे टाकत, ढगफुटी, बंधारा फुटला, बाजारपेठेत पाणी शिरले, मका, भुईमुग पिक वाया गेले, केळीची बाग झोपली, रस्ते बंद, छप्पर उडाले, रात्रभर पावसाची बॅटिंग, सूर्यदर्शन नाही, अशा बातम्या येत आहेत. क्रिकेट मॅचमध्ये पहिल्याच षटकात सहा भिडू बाद व्हावेत तसा मान्सूनपूर्व पावसातच पूर्ण वाट लागावी अशी स्थिती मे महिन्यात निर्माण झाली आहे. दुष्काळी पट्यात आणि लातूर, कोकण, विदर्भासह बारामती परिसरात या पावसाने पेकाट मोडले आहे. भीमाशंकर येथे विक्रमी पर्जन्यवृष्टी झाल्याने भीमेला पूर आला आहे, पंढरपूरचं चंद्रभागेचं वाळवंट आणि तेथील देवालये पाण्यात कोंडली गेली आहेत. हे सारे मे महिन्यात होणे अभूतपूर्व आहे. नेहमीप्रमाणे मुंबईची तुंबई झाली आहे. भूयारी रेल्वेमार्ग अडचणीत आल्याने त्यांची उपयुक्तता स्पष्ट झाली आहे. मुंबईचे सोडा इतरत्रही पावसाळापूर्व नालेसफाई फारशी कुठं परिणामकारक झालेली दिसून येत नाहीत. अजून मे महिना सुरु आहे या भ्रमात असलेल्या यंत्रणेला निसर्गाने जबरदस्त तडाखा दिला आहे. याला जबाबदार कोण, योग चांगला म्हणून पाऊस टिपेला होता तेव्हा समुद्राला भरती नव्हती, मुंबईचे रस्ते अर्धवट झालेत, ख•sमुक्त मुंबई घोषणाच ठरली आहे व आता ठेकेदार कुणाचे, कामे अर्धवट, निकृष्ट आणि बिले संपूर्ण अदा अशी टीका टिपण्णी सुरु आहे. यात कुणाचे हात गरम झाले आणि कुणाला चटके बसले ही धुणी आता राजकीय कट्यावर धुतली जात आहेत. त्यात जनतेला आता रसही नाही व करमणूकही उरलेली नाही. भारत-पाकिस्तान संघर्षाच्या काळात हे पळाले, ते बंकरमध्ये दडले वगैरे बातम्या आणि भारताने जपानला मागे टाकत जगातील चौथी अर्थव्यवस्था होण्याचा मिळवलेला मान वगैरे माहिती हे सारे हवेतले बाण होते असे वास्तव पुढे आले आहे. तुलनेने प्रिंट मीडिया थोडा बरा आहे पण सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांची विश्वासाहर्ता संपत चालली आहे. पावसाचे थैमान अजूनही संपलेले नाही, या वादळात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मान्सूनचे आगमन वेळेपूर्वी दहा दिवस आधी झाले आहे. मान्सून हे भारतीयांसाठी वरदान आहे. मान्सून चांगला बरसला तर भारतीय शेतकरी आणि भारतीय अर्थव्यवस्था चमकून निघते. मात्र राज्यात ढगफुटी, रेड अलर्ट, बंधारे भरले, फुटले असं तांडव सुरू असतानाच आणि पीक वाया गेले म्हणून शेतकरी रडत असताना भारतीय हवामान खात्याने यंदा मान्सून चांगला बरसणार, सरासरी पेक्षा जास्त बरसणार असा अंदाज व्यक्त केला आहे. आनंदवार्ता म्हणून त्यांनी ही घोषणा केली असून जून ते सप्टेंबर या पावसाळी महिन्यांसाठी हा अंदाज व्यक्त झाला आहे. पाऊस चांगला होणार याचा आनंद तर आहेच पण पहिल्या घासालाच खडा आल्याने हा चांगला पाऊस फायदेशीर ठरणार का? ही भीती दाटली आहे. मे महिन्यातच दुष्काळी भागातील पाझर तलाव तुडुंब भरले अशी घटना शेतकऱ्यांना नवी आहे. पाऊस भरपूर आहे या पार्श्वभूमीवर यंदा उसाचे क्षेत्र वाढणार हे वेगळे सांगायला नको. ओघानेच साखर उद्योग फॉर्मात येणार हे उघड आहे. शेतात पाणी साठले आहे. विहिरी तुडुंब भरल्या आहेत. कांदा, मका, भुईमूग पीक शिवारात आहे, शेतकऱ्यांना मशागत करायला, पेरायलाही संधी नाही. पीक वाया गेल्याने तोंडचा घास पळवला गेला आहे. जमिनीचे नुकसान झाले आहे. डोक्यावर कर्जाचा बोजा आहे अशा चक्रव्यूहात अडकलेला शेतकरी मान्सून सवड न देता धो धो बरसायला लागला तर आणखी कर्जात रुतणार आहे. या शेतकऱ्यांना तातडीने खरीपासाठी मदत आणि नुकसानभरपाई मिळणे गरजेचे आहे. याच जोडीला या पावसाच्या तांडव पार्श्वभूमीवर वाढते शहरीकरण रोखून गावे समृद्ध आणि पर्यावरण पूरक, रोजगारक्षम होतील असे नियोजन गरजेचे वाटते. भारताने जपानला मागे टाकले की नाही हे दिसते आहेच. पण क्रमांक कितवा यापेक्षा आनंदी लोकसंख्या किती हे महत्त्वाचे. भारत एकेकाळी सुवर्णभूमी होता, अव्वल होता. पारतंत्र्यात आणि परकीय आक्रमणामुळे तो मागे पडला पण पुन्हा तो सुवर्णकाळ बघेल यात शंका नाही पण या सर्व वाटचालीत भारतीयांचा आनंद निर्देशांक सर्वोत्तम असला पाहिजे. रोजगार वाढला पाहिजे, प्रत्येकाचे उत्पन्न वाढले पाहिजे. अर्थव्यवस्था पातळीवर गुणानूक्रम चांगला, अव्वल असला पाहिजेच पण गुणवत्ता पण अव्वल पाहिजे. राजकीय घाटावर भ्रष्टाचाराची धुणी भ्रष्टाचारी धुतच राहणार. युवकांनी आता राष्ट्र उभारणीत आणि परीघाबाहेरचा विचार करुन देश वैभवशाली करण्यासाठी, सर्व नागरिक आनंदी होतील अशी कामगिरी करण्यावर भर दिला पाहिजे. सुदैवाने तशी क्षमता भारतीय युवकांकडे आहे व या कामाला मोठी संधी आहे.
तूर्त पाऊस चांगला बरसणार सरासरीपेक्षा जास्त बरसणार या अंदाजाचे स्वागत आणि खरीप हंगाम यशस्वीतेसाठी हार्दिक शुभेच्छा.