For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दोन्ही गटांना आदेश पाळण्याचा आदेश

07:00 AM Apr 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
दोन्ही गटांना आदेश पाळण्याचा आदेश
Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील वादासंबंधी सुनावणी

Advertisement

दोन्ही गट पुन्हा समोरासमोर

  • अजित पवार गट आणि शरद पवार गट यांचे एकमेकांविरोधात आरोप
  • न्यायालयाने दिली दोन्ही गटांना आदेश काटेकोरपणे पाळण्याविषयी सूचना
  • दोन्ही गटांनी न्यायालयात गुंतून पडण्याऐवजी प्रचाराकडे लक्ष केंद्रीत करावे

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह यांच्यासंदर्भात जे आदेश देण्यात आले आहेत, त्यांचे पालन राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट आणि शरद पवार गट या दोन्ही गटांनी काटेकोरपणे करावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. गुरुवारी या दोन्ही गटांमधील वादासंबंधी सर्वोच्च न्यायालयात पुढची सुनावणी पार पडली. या सुनावणीमध्ये हा नवा आदेश देण्यात आला. या दोन्ही गटांनी आता न्यायालयीन वादांमध्ये गुंतून पडण्याऐवजी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराकडे लक्ष द्यावे. शरद पवार गटाने आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या पक्षाचे नवे नाव, अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार, तसेच तुतारी फुंकणारा मनुष्य या चिन्हासंबंधी योग्य प्रकारे जाणीव करुन द्यावी. तसेच या गटाचे नेते, उमेदवार, कार्यकर्ते, कार्यालयीन अधिकारी आणि इतर संबंधित यांनी पूर्वीच्या ‘घड्याळ’ या चिन्हाचा उपयोग करु नये, असा आदेशही देण्यात आला.

अजित पवार गटालाही आदेश

अजित पवार गटालाही सर्वोच्च न्यायालयाने काही आदेश दिले आहेत. या गटाला देण्यात आलेले मूळचे ‘घड्याळ’ हे चिन्ह सध्या न्यायप्रविष्ट आहे, याची जाणीव या गटाने वृत्तपत्रांमध्ये ठळक जाहिराती देऊन सर्व संबंधितांना करुन द्यावी, असा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिला. यासंबंधी आदेश सर्वोच्च न्यायालयाने 19 मार्चलाच दिला होता. तोच आदेश पुन्हा देण्यात आला आहे.

शरद पवार गटाचा युक्तिवाद

शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी गुरुवारी युक्तिवाद केला. आम्ही येथे तक्रारी घेऊन आलेलो नाही. पण अजित पवार गटाचे पोस्टर्स, बॅनर्स, जाहिराती इत्यादींमध्ये घड्याळ हे चिन्ह न्यायप्रविष्ट आहे, असे ‘डिस्क्लेमर’ देण्यात आलेले नाही हे आम्हाला लक्षात आणून द्यायचे आहे. यासंबंधी न्यायालयाने स्पष्ट सूचना करावी, एवढेच आमचे म्हणणे आहे, असा युक्तिवाद त्यानी केला.

अजित पवार गटाकडून प्रतिवाद

अभिषेक मनु सिंघवाr यांच्या युक्तिवादाचा प्रतिवाद अजित पवार गटाचे ज्येष्ठ विधीज्ञ मुकुल रोहटगी यांनी केला. शरद पवार गटाने सादर केलेल्या दुसऱ्या अर्जाकडे त्यांनी लक्ष वेधले. हा अर्ज पूर्वी वितरीत केला नव्हता. आता तो नव्याने समोर आला आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर न्यायालयाने दोन्ही गटांना स्पष्ट आदेश द्यावा. तसेच न्यायालयासमोरील सर्व साधने लक्षात घेऊन दोन्ही गटांना योग्य तो आदेश द्यावा, अशी विनंती त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला केली.

प्रकरण काय आहे ?

शरद पवार यांनी स्थापन केलेल्या मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एक वर्षभरापूर्वी फूट पडली होती. अजित पवार पक्षाच्या 40 आमदारांसह बाहेर पडले आणि त्यांनी आमचाच राष्ट्रवादी काँगेस पक्ष खरा असल्याचा दावा केला. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर दोन्ही गटांची सुनावणी झाली. आयोगाने अजित पवार यांचा गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निर्वाळा देऊन या पक्षाला घड्याळ हे चिन्ह उपयोगात आणण्याची अनुमती दिली. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून तेथे हे प्रकरण प्रलंबित आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही अजित पवार यांचाच गट खरा राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचे स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.