दोन्ही जि.पं.अध्यक्षांची बिनविरोध निवड होणार
पणजी : उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षपदी शंकर चोडणकर आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षपदी संजना वेळीप यांची बिनविरोध निवड झाल्यात जमा आहे. काल शुक्रवारी अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस होता. दोन्ही ठिकाणी एक एकच अर्ज आल्याने आता निवडणूक होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान जिल्हा पंचायतीच्या उपाध्यक्षांनाही राजीनामा देण्याचे निर्देश भाजपच्या पक्षीय पाळीवरून देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. येत्या सोमवारी 2 सप्टेंबर रोजी दोन्ही जिल्हा पंचायत अध्यक्षांची बिनविरोध निवड जाहीर होणार आहे.
दोन्ही जिल्हा पंचायतीत भाजपचे बहुमत असून अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्याचे भाजपने ठरविले आहे. त्यामुळे वरील दोन नावे अध्यक्षपदांसाठी अंतिम करण्यात आली आहेत. काहीजणांनी वरील पदे मिळावीत म्हणून जोरदार मोर्चेबांधणी केली होती. परंतु भाजपने अंतिम उमेदवार दिल्यामुळे त्यांना मुग गिळून गप्प बसावे लागले. पक्षाच्या आदेशानुसार सिद्धेश नाईक व सुवर्णा तेंडुलकर यांनी यापुर्वीच अध्यक्षपदाचे राजीनामे दिले. दोन्ही जिल्हा अध्यक्षांना दोन वर्षेच देण्याचा करार पक्षातर्फे करण्यात आला होता. त्यानुसार त्यांनी राजीनामा दिला होता.