कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शिव्यांच्या भडिमारात रंगला बोरीचा बार...!

12:42 PM Jul 31, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

लोणंद :

Advertisement

खंडाळा तालुक्यातील सुखेड आणि बोरी या दोन शेजारी गावांमधील ऐतिहासिक, पण तितकीच आगळीवेगळी परंपरा असलेला 'बोरीचा बार' उत्सव हजारो ग्रामस्थांच्या व पाहुण्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.

Advertisement

'बोरीचा बार' ही परंपरा केवळ शिवीगाळापुरती मर्यादित नसून, ती समाजातील विसंगतींना विनोदी पद्धतीने सामोरे जाण्याची व गावकऱ्यांमधील जुनी वैरभावना विसरण्याची एक प्रकारची सामाजिक भूमिका बजावते. या परंपरेच्या मुळाशी एक दंतकथा आहे एका पाटलाच्या सुखेड व बोरी गावातील दोन बायका, ओढ्यावर धुणं धुताना वारंवार वाद घालायच्या आणि एकमेकींना शिव्या द्यायच्या. हळूहळू हा वाद गावाच्या परंपरेत परिवर्तित झाला आणि आज तो एक सामुदायिक सण बनून गेला आहे.

बुधवारी दुपारी १२.१५ ते १.०० या वेळेत बोरी-सुखेड गावांच्या सीमा जिथे ओढ्याने विभागल्या आहेत, तिथेच हा सोहळा पार पडतो. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत, गळ्यात माळा, डोक्यावर फेटे बांधून सनई-हलगीच्या तालावर गोंधळ घालत, झिम्मा फुगडी खेळत मोठ्या उत्साहात ओढ्याकडे कूच केली. ओढ्यावर पोहोचल्यानंतर दोन्ही गावांच्या महिलांनी समोरासमोर उभं राहत एकमेकींवर हशा-पटकारे, हातवारे आणि शिव्यांचा भडिमार सुरू केला. हे दृश्य पाहताना प्रथमदर्शनी भांडण वाटेल, पण या शिव्यांमध्ये विनोद, नाट्यमयता आणि ग्राम्य बोलीतील चटकदार रचना असते. "तुझ्या घरचं लोंबकं गवत खाल्लं गाढवाने!" अशा शैलीतील शिव्या महिलांमध्ये हशा आणि जल्लोष निर्माण करत होत्या.

या अनोख्या उत्सवासाठी यंदा लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष बंदोबस्त ठेवला होता. महिला पोलिसांची स्वतंत्र तुकडीही तैनात होती. उत्सवात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रत्येक टोकावर पोलीस हजर होते.

बोरी गावात उत्सवाच्या निमित्ताने यात्रेचे स्वरूप आले होते. गावातील रस्त्यांवर मिठाईची दुकाने, खेळणी, गरम गरम भजी, वडापाव, उसाचा रस, तसेच छोट्यांसाठी खेळण्याची झोपाळी (पाळणे) थाटले होते. बाजारात खरेदीसाठी लोकांनी गर्दी केली होती तरुणाई सेल्फी, रील्स व फोटोशूटमध्ये गुंग होती हे बघ, मी बोरीच्या बारात आलोय ! अशा कॅप्शनसह अनेकांनी आपले सोशल मीडिया पोस्ट आधीच अपलोड केल्या होत्या.

या उत्सवामध्ये केवळ परंपरा टिकवून ठेवली जात नाही, तर ती समाजातील ऐक्य आणि सामंजस्याचे प्रतिक ठरते. प्रत्यक्षात बोरीच्या बारादिवशी दोन्ही गावांतील महिला एकमेकींवर शिव्या घालत असल्या, इतर दिवशी यामध्ये कुठेही खऱ्या वैरभावनेचा अंश नसतो.

जिल्ह्याबरोबरच पुणे, सांगली, सोलापूर आदी भागांतून लोक बोरीचा बार पाहण्यासाठी आले होते. युट्युबर व अभ्यासकांनीही परंपरेचे चित्रीकरण केले.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article