बोरगाव व बहे बंधारे पाण्याखाली
बोरगाव :
गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. वाळवा तालुक्यातील बोरगाव-रेठरेहरणाक्ष आणि बहे येथील बंधारे पूर्णतः पाण्याखाली गेले आहेत. पडणारा अविरत पाऊस आणि धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग यामुळे नदी पात्रात पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे.
नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे, कारण पाण्याची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे.
शेतीमधील उभ्या पिकांत आता पाणी शिरू लागले असून, ओढे-नाले भरून वाहू लागले आहेत. पावसाचे पाणी थेट नदीपात्रात मिसळत असून, त्यातच कोयना धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामुळे पाण्याची पातळी अधिकच वाढत आहे.
बोरगाव-रेठरेहरणाक्ष दरम्यानचा बंधारा पाण्याखाली गेल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे. त्यामुळे बोरगाव मळीभाग आणि रेठरेहरणाक्ष गावांमध्ये दळणवळण ठप्प झाले आहे.
प्रशासनाने कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील सर्व नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.