कंटाळल्याने जारी केले स्वत:चे अटक वॉरंट
जाहीर केले इनाम, पोलीस आल्यावर...
उत्तर चीनमध्ये एका इसमाने कंटाळा घालविण्यासाठी काही तरी विचित्रच कृत्य केले आहे. त्याने केलेले हे कृत्य कुणाच्या ध्यानीमनीही येऊ शकत नाही. त्याने इंटरनेटवर स्वत:साठी अटक वॉरंट तयार केले आणि स्वत:वरच इनाम घोषित केले आहे.
वांग नावाच्या या इसमाने 11 नोव्हेंबर रोजी सोशल मीडियावर ‘वाँटेड ऑर्डर’ नावाने एक संदेश पोस्ट केला. ज्यासोबत त्याचे एक छायाचित्र देखील होते, स्वत:च्या पोस्टमध्ये त्याने स्वत:ला वांग यिबो संबोधिले, जे मुख्य चीनचा एक प्रमुख अभिनेता आणि नर्तकाचे नाव आहे.
शांक्सी प्रांताच्या चांगझी शहरातील किनयुआन काउंटीचा मी रहिवासी आहे. मी 10 नोव्हेंबर रोजी एका कंपनीकडून 33 कोटी रुपयांची खंडणी वसूल केली आहे. माझ्याकडे एक सबमशीन गन असून 500 गोळ्या आहेत. जर तुम्ही मला शोधलात तर तुम्हाला 3.3 लाख रुपयांचे इनाम मिळेल असे त्याने या पोस्टमध्ये नमूद पेल होते.
12 नोव्हेंबर रोजी काउंटीच्या स्थानिक पोलिसांनी वांगची ही विचित्र पोस्ट पाहिली, ज्याचे ऑनलाइन टोपणनाव ओयुनसुइशीयू असून याचा अर्थ ‘कुठल्याही क्षणी भाग्य उजळणार’ असा होतो. अधिकाऱ्यांनी याप्रकरणी तपास सुरू करत काही तासातच त्याला अटक केली आहे.
मिळाली नाही मशीनगन
पूर्ण तपासणी केल्यावरही पोलिसांना वांगकडे कुठलीही आक्षेपार्ह वस्तू, बंदूक किंवा दारुगोळा सापडला नाही. तसेच त्याने कुठल्याही कंपनीकडुन खंडणीही वसूल केली नव्हती. स्वत:च्या जीवनात निराश अन् कंटाळलो होतो असे त्याने चौकशीत सांगितले आहे.
पोलिसांनी केली अटक
वांगच्या पोस्टचा सामाजिक स्तरावर मोठा प्रतिकूल प्रभाव पडला आहे. 24 तासांपेक्षा कमी कालावधीत त्याची पोस्ट 3,50,000 वेळा पाहिली गेली आहे. तर 2500 लाइक्स मिळाल्या आणि 1155 शेअरसोबत 80 नेटिजन्सनी टिप्पणी केली आहे. पोलिसांनी खोटी माहिती प्रसारि करण्यासाठी वांगवर गुन्हा नोंद करत त्याला अटक केली आहे.