For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सीमेची सुरक्षा कर्तव्य, मागे हटणार नाही!

07:00 AM Mar 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
सीमेची सुरक्षा कर्तव्य  मागे हटणार नाही
Advertisement

चीनसोबतच्या वादाप्रकरणी जयशंकर यांचे वक्तव्य : पॅलेस्टाइनसंबंधी केली टिप्पणी

Advertisement

वृत्तसंस्था /क्वालांलपूर

मलेशिया दौऱ्यावर असताना विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी भारत-चीन संबंधांवर भूमिका मांडली आहे.  चीनचे सैन्य मागे हटले आणि त्यांची तैनात जुन्या पॉइंट्सवर करण्यात आली तरच द्विपक्षीय संबंधसुरळीत होऊ शकतात. चीनसमोर स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली आहे. सीमा सुरक्षित करणे हे माझे देशवासीयांसाठीचे पहिले कर्तव्य असून यापासून कधीच मागे हटणार नसल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. प्रत्येक देश स्वत:च्या शेजाऱ्यांसोबत चांगले संबंध इच्छितो. परंतु संबंध कुठल्या न कुठल आधारावरच स्थापित करावे लागेल. आम्ही अद्याप चीनसोबत चर्चा करत आहोत. मी चीनच्या विदेशमंत्र्यांशी चर्चा करतो. तसेच आम्ही वेळोवेळी भेटत असतो. आमचे सैन्य कमांडर चर्चा करतात, असे विदेशमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. दोन्ही देशांच्या सैन्याचे तळ काही अंतरावर आहेत. हे तळ आमचे पारंपरिक तैनातीचे ठिकाण आहे आणि आम्ही हीच सामान्य स्थिती इच्छितो. हीच स्थिती संबंध पुढे नेण्याचा आधार असेल असेही त्यांनी नमूद केले आहे.

Advertisement

रशिया-युक्रेन युद्ध

रशिया-युक्रेन युद्धाच्या प्रारंभापासूनच आमची भूमिका स्पष्ट राहिली आहे. कुठल्याही मुद्द्यावर युद्धभूमीवर तोडगा काढला जाऊ शकत नाही. यात कुणाचाच विजय होत नाही. भारत नेहमीच युद्ध संपुष्टात आणण्याच्या भूमिकेच्या बाजूने राहिला आहे. भारत दोन्ही देशांच्या संपर्कात असल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे.

हमास-इस्रायल युद्ध

मलेशिया दौऱ्यात विदेशमंत्री जयशंकर यांनी इस्रायल-हमास युद्धावरही वक्तव्य केले आहे. इस्रायल-हमास युद्धाचे सर्वात मोठे वास्तव म्हणजे पॅलेस्टिनींकडून त्यांचे घर, त्यांची भूमी आणि अधिकार हिरावून घेण्यात आले आहेत असे जयशंकर यांनी म्हटले आहे.

द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर चर्चा

जयशंकर यांनी यापूर्वी मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांची भेट घेत मजबूत द्विपक्षीय संबंधांसाठीच्या त्यांच्या दृष्टीकोनाचे कौतुक केले आहे. भारत आणि मलेशियाच्या संबंधांसाठी त्यांच्या दृष्टीकोनामुळे अधिक महत्त्वाकांक्षी अजेंडा तयार करण्यास मदत मिळणार आहे. क्षेत्रीय विकासावर इब्राहिम यांच्या मार्गदर्शनामुळे लाभ मिळाला असल्याचे उद्गार जयशंकर यांनी काढले आहेत.

चीनकडून कराराचा भंग

सीमा वादादरम्यान 1980 च्या दशकात दोन्ही देशांमध्ये कुणीही स्वत:चे सैन्य सीमेवर तैनात करणार नसल्याची सहमती झाली होती. तसेच कुठल्याही स्थितीत हिंसा किंवा रक्तपात घडविला जाणार नसल्याचे ठरविण्यात आले होते. परंतु चीनने 2020 मध्ये हा करार तोडला आणि सीमेवर रक्तपात झाल्याचा आरोप जयशंकर यांनी केला आहे. जून 2020 मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीनंतर भारत आणि चीन संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

Advertisement
Tags :

.