महामेळाव्यात सीमाबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे
जांबोटीत खानापूर तालुका म. ए. समितीच्या वतीने पत्रके वाटून जागृती
वार्ताहर/जाबोटी
कर्नाटक सरकारने बेळगावसह सीमाभागावर आपला हक्क सांगण्यासाठी हलगा येथे सुवर्ण विधानसौध बांधून बेळगावला उपराजधानीचा दर्जा देऊन, या ठिकाणी दरवर्षी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरविण्यात येते. यावर्षी कर्नाटक सरकारचा हा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी व अधिवेशनाला विरोध दर्शविण्यासाठी बेळगावमध्ये अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मध्यवर्ती म. ए. समितीच्या वतीने मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात येते. यावर्षी देखील सोमवार दि. 8 डिसेंबर रोजी बेळगावमध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन केले आहे. मेळाव्यात सीमावासियांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून मराठी भाषिकांची एकजूट दाखवून द्यावी, असे आवाहन मंगळवारी जांबोटी येथे खानापूर तालुका म. ए. समितीच्या वतीने करण्यात आले.
या जागृती फेरीमध्ये मोठ्या संख्येने मराठी भाषिक सामील झाले होते. बेळगाव मराठी माणसाच्या अस्मितेचा मानबिंदू असून कर्नाटक सरकारने मराठी भाषिकांवर कितीही अन्याय, अत्याचार केले तरी मराठी जनता महाराष्ट्रात सामील होण्याच्या आपल्या निर्धारापासून तसुभरही मागे हटणार नाही. सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्नाचा खटला दाखल झाला असून येत्या जानेवारी महिन्यात सुनावणीला प्रारंभ होणार असल्यामुळे मराठी भाषिकांचे मनोबल उंचावले आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारचा बेळगाववर हक्क सांगण्याचा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी, सोमवार दि. 8 डिसेंबर रोजी बेळगाव येथे होणाऱ्या महामेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी म. ए. समिती कार्यकर्त्यांनी जांबोटी बसस्थानक तसेच बाजारपेठेत पदयात्रा काढून घरोघरी पत्रकांचे वाटप करण्यात आले.
या जागृती फेरीमध्ये म. ए. समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी, जि. पं.माजी सदस्य जयराम देसाई, माजी सभापती मारुती परमेकर, भू विकास बँकेचे संचालक लक्ष्मण कसरलेकर, शंकर सडेकर, समिती नेते प्रकाश चव्हाण, राजाराम देसाई, बाबुराव भरणकर, रवींद्र देसाई, अरुण देसाई, प्रभाकर बिर्जे, गणपती सावंत, मोहन देसाई, रवींद्र शिंदे, विठ्ठल देसाई, विलास कवठणकरसह बहुसंख्य समिती कार्यकर्ते सहभागी झाले होते.