मिश्र दुहेरीत बोपण्णाचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
भारताचा रोहन बोपण्णा व इंडोनेशियाची त्याची साथीदार अॅल्डिला सुत्जियादी यांचे अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीतील आव्हान उपांत्य फेरीत समाप्त झाले. अमेरिकेच्या टेलर टाऊनसेंड व डोनाल्ड यंग यांनी त्यांच्यावर मात करीत अंतिम फेरी गाठली.
बोपण्णा-सुत्जियादी यांना यंग-टाऊनसेंड यांच्याकडून 6-3, 6-4 असा पराभव स्वीकारावा लागला. हा सामना 55 मिनिटे चालला होता. पराभूत जोडीने पहिले तीन गेम जिंकून जोरदार सुरुवात केली होती. पण नंतर त्यांचा जोम ओसरला आणि मुसंडी मारण्यात त्यांना अपयश आले. बोपण्णा-सुत्जियादी यांनी चार बिनतोड सर्व्हिस केल्या आणि कमी चुका केल्या तरीही यंग-टाऊनसेंड यांचे 26 विजयी फटके भारी ठरले. टाऊनसेंड-यंग यांची अंतिम लढत इटलीच्या सारा इराणी व आंद्रेया वावासोरी यांच्याशी होईल.
बोपण्णाचे पुरुष दुहेरीतील आव्हानही तिसऱ्या फेरीतच समाप्त झाले असल्याने या स्पर्धेत आता भारतीय खेळाडूंचे आव्हानही संपले आहे. याशिवाय एन.श्रीराम बालाजी, युकी भांब्री यांनाही दुहेरीत सुरुवातीला पराभव स्वीकारावा लागला. एकेरीत सुमित नागलला पहिल्या फेरीतच स्पर्धेबाहेर पडावे लागले होते.