वजन कमी केल्यावर कंपनीकडून बोनस
चीनमध्ये एका कंपनीने कर्मचाऱ्यांना वजन कमी करण्यासाठी प्रोत्साहित करत 140000 डॉलर्सचा बोनस दिला आहे. या घटनेची आता सोशल मीडियावर मोठी चर्चा होतेय. यातील एका कर्मचाऱ्याला केवळ 90 दिवसांमध्ये 20 किलोग्रॅमहून अधिक वजन कमी केल्याबद्दल 20 हजार युआन मिळाले आहेत. शेन्जेन येथील टेक फर्म अरशी व्हिजन इंक या कंपनीने हा उपक्रम राबविला आहे. या कंपनीला इन्स्टा 360 स्वरुपात ओळखले जाते. या कंपनीने स्वत:च्या वार्षिक ‘मिलियन युआन वेट लॉस चॅलेंज’मुळे प्रसिद्धी मिळविली आहे. या पुढाकाराचा उद्देश कर्मचाऱ्यांना नियमित व्यायाम आणि संतुलित आहाराच्या माध्यमातून स्वस्थ जीवनशैली अंगिकारण्यासाठी प्रेरित करणे आहे.
सर्व कर्मचारी या चॅलेंजच्या नोंदणीसाठी पात्र होते आणि प्रत्येकी 0.5 किलोग्रॅम वजन कमी करत स्पर्धकांना 500 युआनचे रोख इनाम मिळू शकत होते. या चॅलेंजमध्ये एक दंडात्मक तरतूदही सामील आहे. ज्या स्पर्धकांचे वजन वाढले, त्यांनी प्रत्येक अर्धा किलो वजन वाढल्यास 800 युआनचा दंड भरण्याचा नियम होता. परंतु आतापर्यंत हा दंड कुणावरही ठोठावण्यात आलेला नाही. यंदा जेन-झेड कर्मचारी झी याकीने तीन महिन्यात 20 किलोग्रॅम वजन कमी केले आणि 20 हजार युआनचे रोख इनाम आणि वेट लॉस चॅम्पियनचा पुरस्कार मिळविला. मी पूर्ण चॅलेंजदरम्यान शिस्त पाळत होते, माझ्या आहाराचे लक्षपूर्वक व्यवस्थापन केले आणि प्रतिदिन 1.5 तास व्यायाम केला. हा माझ्या जीवनातील सर्वात चांगला वेळ असल्याचे माझे मानणे आहे. हे केवळ सौंदर्यापुरती नसून आरोग्याबद्दल असल्याचे तिचे सांगणे आहे.
घटविले 20 किलो वजन
झीने ग्रूप चॅटमध्ये वजन घटविण्याची प्रक्रिया शेअर केली, जेणेकरून अन्य सहकाऱ्यांना प्रेरित करता येईल. ज्याप्रकारे आहाराद्वारे चिनी अभिनेता किन हाओला केवळ 15 दिवसांमध्ये 10 किलोग्रॅम वजन कमी करण्यास मदत मिळाली, त्याच पद्धतीला तिने अनुसरले. याच्या पहिल्या दिवशी केवळ सोया दूध पिणे, दुसऱ्या दिवशी मका खाणे, तिसऱ्या दिवशी फळे खाणे त्यानंतरच्या दिवसांमध्ये प्रोटीन आणि भाज्यांना आळीपाळीने सामील करण्याची प्रक्रिया तिने अवलंबिली होती.
या स्पर्धेचे आतापर्यंत 7 सीझन
2022 पासून कंपनीने या चॅलेंजचे 7 सीझन आयोजित केले असून एकूण पुरस्कारादाखल सुमारे 2 दशलक्ष युआन खर्च केले आहेत. मागील वर्षी 99 कर्मचाऱ्यांनी यात भाग घेतला होता. सामूहिक स्वरुपात 950 किलोग्रॅम वजन त्यांनी कमी पेले आणि रोख इनामादाखल 10 लाख युआन वितिरत करण्यात आले. या आव्हानाच्या माध्यमातून एक तंदुरुस्त जीवनशैलीला चालना देणे हा आमचा उद्देश होता, कर्मचाऱ्यांना स्वत:च्या कल्याणासाठी प्राथमिकता देण्याकरता प्रोत्साहित करण्याचा हा आमचा प्रयत्न असल्याचे कंपनीने म्हटले आहे.