For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विमानतळ, मॉलना बॉम्बस्फोटाची धमकी

11:09 AM Dec 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
विमानतळ  मॉलना बॉम्बस्फोटाची धमकी
Advertisement

बेंगळूर पोलीस आयुक्तांना ई-मेल : भीती पसरवण्यासाठी संदेश : गस्त, तपासणी, सुरक्षा व्यवस्थेत वाढ

Advertisement

बेंगळूर : जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या नावाने धमकीचा ई-मेल पाठविण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. बेंगळूरमधील केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि शहरातील अनेक शॉपिंग मॉलमध्ये बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीचा संदेश बेंगळूर शहर पोलीस आयुक्तांना त्यांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर पाठविण्यात आला आहे. यासंबंधी पोलिसांनी एफआयआर नोंदवून धमका देणाऱ्याचा शोध जारी केला आहे. 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:53 वाजता मोहितकुमार नामक व्यक्तीच्या नावाने बेंगळूर पोलीस आयुक्तांना अधिकृत ई-मेलवर बॉम्बस्फोटाच्या धमकीचा संदेश पाठविण्यात आला होता. त्यानुसार तपासणी केली असता केवळ भीती पसरविण्याच्या उद्देशाने हा संदेश पाठविण्यात आल्याचे निष्पन्न  झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

‘जैश-ए-मोहम्मद व्हाईट कॉलर टेटर टीम’ या नावाने पोलीस आयुक्तांना ई-मेल पाठविण्यात आला होता. आम्ही सायंकाळी 7 वाजता केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ, ओरियन मॉल, लुलू मॉल, फोरम मॉल, मंत्री स्क्वेअर मॉलमध्ये बॉम्बस्फोट घडवू, अशी धमकी देण्यात आली होती, असा उल्लेख एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. ई-मेलमध्ये फोन क्रमांकाचा उल्लेख असून त्या क्रमांकावर पैसे पाठवून हल्ले रोखता येऊ शकतात, असे नमूद असल्याचे सांगण्यात आले आहे. तक्रारीच्या आधारे सायबर गुन्हे पोलीस स्थानकात माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 एफ अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात मोहितकुमारच आरोपी आहे की अन्य कोणी, याबाबत तपास केला जात आहे.

Advertisement

शहरात बंदोबस्त, गस्तमध्ये वाढ

धमकीचा संदेश आल्यानंतर लागलीच सीआयएसएफ आणि विमानतळ सुरक्षा कर्मचाऱ्यांनी विमानतळावरावर कसून तपासणी केली. प्रवाशांच्या बॅगची तपासणी, वाहन तपासणी आणि प्रवेशद्वारांवर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. खासगी सुरक्षा कर्मचारी आणि पोलीस देखील शहरातील मॉलवर लक्ष ठेवून आहेत. पोलिसांनी जनतेला घाबरून जाऊ नये आणि कोणत्याही संशयास्पद व्यक्ती किंवा साहित्याची माहिती त्वरित जवळच्या पोलीस स्थानकाला द्यावी, असे आवाहन केले आहे. या प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने चौकशी केली जात आहे, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

पोलिसांकडून खबरदारी

शहरात गस्तीच्या वाहनांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. प्रमुख रस्ते आणि चौकांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर आहे. तपास अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे. ई-मेल पाठवणाऱ्याची ओळख पटविण्यास वेळ लागेल. मात्र,धोक्याचे कोणतेही संकेत दिसल्यास त्वरित कारवाई करण्यास पोलीस सज्ज आहेत. धमकीच्या पार्श्वभूमीवर बेंगण्tर पोलिसांनी आवश्यक खबरदारी घेतली आहे.

Advertisement
Tags :

.