सांबरा विमानतळाला बॉम्बची धमकी
पोलिसांत फिर्याद दाखल : श्वानपथक, स्फोटक शोधक पथकाकडून तपासणी
बेळगाव : सांबरा विमानतळाला बॉम्बची धमकी देण्यात आली आहे. यासंबंधी आलेल्या इमेल संदेशामुळे एकच खळबळ माजली असून विमानतळावर सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे. श्वानपथक व स्फोटक शोधक पथकाकडून तपासणी करण्यात आली आहे. देशभरात बॉम्बने विमान उडविण्याची धमकी देण्याचे प्रकार सुरूच आहेत. शनिवारी एका दिवसात 30 हून अधिक धमकीचे प्रकार उघडकीस आले असून सांबरा विमानतळालाही धमकीचा इमेल आला आहे. यासंबंधी सुरक्षा अधिकारी मोहिनी शंकर यांनी मारिहाळ पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे.
बॉम्बची धमकी देणारा इमेल कोणी पाठविला? व कोठून पाठविला? याचा तपास करण्यात येत आहे. धमकीच्या मेलचा गांभीर्याने दखल घेत श्वानपथक व बॉम्बशोधक पथकाकडून संपूर्ण विमानतळ परिसराची तपासणी करण्यात आली आहे. विमानतळ परिसराची तपासणी करण्याबरोबरच सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आल्याचे पोलीस उपायुक्तांनी सांगितले. इमेल संदेश पूर्णपणे वाचून पाहता ही धमकी केवळ सांबरा विमानतळासाठीची नव्हती तो फॉरवर्डेड मेल होता. शनिवारी सायंकाळी व रविवारीही इमेल संदेश आला आहे. तपासाअंती विमानतळ परिसरात कोणतीच आक्षेपार्ह वस्तू आढळली नाही, असे पोलीस उपायुक्तांनी सांगितले.