मच्छे केंद्रीय विद्यालयाला बॉम्बची धमकी
श्वानपथकाद्वारे तपासणी : बेळगाव ग्रामीण पोलिसात एफआयआर
बेळगाव : सांबरा विमानतळापाठोपाठ मच्छे येथील केंद्रीय विद्यालयालाही बॉम्बची धमकी आली आहे. गुरुवारी यासंबंधीचा मेल आला आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली असून बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात यासंबंधी एफआयआर दाखल झाला आहे. केंद्रीय विद्यालय क्रमांक 3 च्या प्राचार्यांना गुरुवारी सकाळी एक ई-मेल संदेश आला आहे. या मेलमधून बॉम्बची धमकी देण्यात आली आहे. हा प्रकार उघडकीस येताच बेळगाव ग्रामीण पोलिसांना माहिती देण्यात आली. तपासणीसाठी श्वानपथक व स्फोटक तज्ञांना पाचारण करण्यात आले.
पोलीस उपनिरीक्षक लक्काप्पा जोडट्टी व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. श्वानपथकाच्या मदतीने संपूर्ण परिसराची तपासणी करण्यात आली. मात्र, कोणत्याच प्रकारची स्फोटके आढळून आली नाहीत. त्यामुळे साऱ्यांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. मेल संदेश पाहिल्यानंतर सुरुवातीला सर्व विद्यार्थ्यांना बाहेर पाठविण्यात आले. यासंबंधी प्राचार्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध भारतीय न्याय संहिता 351(4) अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी सांबरा विमानतळालाही बॉम्बची धमकी देण्यात आली होती. त्यापाठोपाठ आता केंद्रीय विद्यालयाला धमकीचा मेल आला आहे. या दोन्ही घटनेत ई-मेलवरूनच धमकीचे संदेश पाठविण्यात आले आहेत.