सीआरपीएफ शाळांमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी
ईमेलद्वारे मिळाली धमकी : तपासणीनंतर सुटकेचा निश्वास
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीच्या रोहिणीमध्ये सीआरपीएफ शाळेनजीक बॉम्बस्फोटानंतर आता देशभरातील अन्य सीआरपीएफ शाळांमध्ये बॉम्बस्फोटावरून धमकी प्राप्त झाली आहे. देशभरातील सीआरपीएफ शाळांना ईमेलद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. यातील दोन शाळा दिल्ली तर एक हैदराबादमध्ये आहे. तर तामिळनाडूच्या कोइम्बतूर येथील चिन्नावेदमपट्टी आणि सरवनमपट्टीमधील खासगी शाळेलाही स्फोटाची धमकी देण्यात आली होती. मंगळवारी सकाळी बॉम्ब स्क्वाडच्या पथकांनी या शाळेत जात तपासणी केली आहे. या तपासणीत काही संशयास्पद आढळून आलेले नाही.
परंतु ईमेलद्वारे प्राप्त धमकी खोटी असल्याचा संशय आहे. दहशत निर्माण करण्यासाठीच समाजकंटकांनी ईमेलद्वारे धमकी दिल्याचे मानले जात आहे. ईमेल पाठविणाऱ्याने धमकीत शाळांच्या वर्गांमध्ये नायट्रेट आधारित आयईडी स्फोट घडविणार असल्याचे म्हटले होते. ईमेलमध्ये सकाळी 11 वाजण्यापूर्वी सर्व शाळा रिकामी करण्यास सांगितले होते. दिल्लीच्या रोहिणीमधील सीआरपीएफ शाळेनजीक यापूर्वीच स्फोट झाला आहे. या स्फोटावरून सुरक्षा यंत्रणांना अद्याप ठोस धागेदारे प्राप्त झालेले नाहीत. या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार आहेत.
धमकीचे द्रमुक कनेक्शन
अमली पदार्थ तस्करी प्रकरणी द्रमुकचा नेता जाफर सादिकला अलिकडेच झालेल्या अटकेच्या प्रभावामुळे आंतरराष्ट्रीय दबाव वाढला असल्याचे आरोपीने ईमेलमध्ये नमूद पेले आहे. तामिळनाडू पोलिसांचा गुप्तवार्ता विभाग द्रमुकच्या अंतर्गत पारिवाकि प्रकरणांमध्ये अत्याधिक ध्रूवीकृत झाला असल्यानेच एम.के. स्टॅलिन परिवाराच्या सहभागावरून लक्ष हटविण्यासाठी केंद्रीय सरकारी शाळांमध्ये किंवा परिसरात अशाप्रकारे स्फोट आवश्यक असल्याचे ईमेलमध्ये म्हटले गेले आहे.
खलिस्तानी कनेक्शन
राहिणीच्या प्रशांत विहार भागात सीआरपीएफ शाळेत झालेल्या स्फोटाकरता खलिस्तानी कनेक्शनच्या दृष्टीकोनातून तपास केला जात आहे. तसेच मेसेजिंग अॅप टेलिग्रामला पत्र लिहून स्फोटाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या समुहाची माहिती मागविली असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे.