दिल्लीतील चार शाळांना पुन्हा बॉम्बच्या धमकीचे ईमेल
दिल्ली
दिल्लीतील चार शाळांना शुक्रवारी पहाटे बॉम्बच्या धमकीचे ईमेल आले आहेत. त्यामुळे सर्वत्र पुन्हा एकत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी अनेक एजन्सींनी शाळांच्या परिसरांची झडती घेतली आहे.
यापूर्वी 9 डिसेंबर रोजी अशाच प्रकारची घटना घडली, त्यावेळी किमान ४४ शाळांना बॉम्बच्या धमकीचे ईमेल पाठवण्यात आले होते. यानंतर पोलिसांनी हे ईमेल फसवे असल्याचे सांगितले.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी, या प्रकरणी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी आठवडाभराच्या कालावधीत शाळांना दुसऱ्यांदा बॉम्बच्या धमकीचे ईमेल आल्याने, मुलांच्या मनावर आणि अभ्यासावरील संभाव्य परिणामांवर प्रश्नचिन्हही उपस्थित केले आहे.
दिल्ली अग्निशमन विभाग, पोलिस, बॉम्ब शोधक पथके आणि श्वानपथकांनी शाळांमध्ये पोहोचून कसून शोध घेतला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी पालकांनाही सावध केले आहे, मुलांना घरी ठेवण्याचा सल्ला दिला किंवा जर ते आधीच शाळेत आले असतील तर त्यांना एकत्र सुरक्षित ठेवा असा सल्ला देण्यात आला आहे.