पाकिस्तानात मशिदीत बॉम्बस्फोट
अनेक जखमी : वझिरीस्तानमध्ये चार दिवसात तिसरा मोठा दहशतवादी हल्ला
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील दक्षिण वझिरीस्तानमध्ये शुक्रवारच्या नमाज दरम्यान एका मशिदीत बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात जमियत उलेमा-ए-इस्लामचे (जेयूआय) जिल्हा प्रमुख अब्दुल्ला नदीम गंभीर जखमी झाले, तर इतर तिघे किरकोळ जखमी झाले. घटनेनंतर लगेचच सर्व जखमींना जिल्हा मुख्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गेल्या चार दिवसांत पाकिस्तानमध्ये झालेला हा तिसरा मोठा दहशतवादी हल्ला आहे. अलिकडच्या काळात खैबर पख्तूनख्वामध्ये हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे, स्फोटांच्या घटना वाढल्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी तपास तीव्र केला आहे. संभाव्य हल्ले रोखण्यासाठी दक्षता घेण्यात येत आहे.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 1:45 च्या सुमारास मशिदीमध्ये मोठा स्फोट झाला. हा एक इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइस (आयईडी) स्फोट होता, जो आझम वारसाक बायपास रोडवरील मौलाना अब्दुल अजीज मशिदीच्या व्यासपीठात लपवण्यात आला होता, असे जिल्हा पोलीस अधिकारी आसिफ बहादूर यांनी सांगितले. या स्फोटात जेयूआयचे जिल्हा प्रमुख अब्दुल्ला नदीम गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यासोबत रहमान उल्लाह, मुल्ला नूर आणि शाह बेहरन हे तिघेही किरकोळ जखमी झाले आहेत.
पोलिसांकडून तपास सुरू
स्फोटाची माहिती मिळताच पोलीस आणि सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले होते. सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घालत घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. खैबर पख्तूनख्वामध्ये यापूर्वीही मशिदींना लक्ष्य करण्यात आले आहे. विशेषत: शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी मशिदींमध्ये मोठ्या संख्येने लोक जमलेले असताना स्फोट झालेले आहेत.
मशिदींवर यापूर्वीही हल्ले
गेल्या महिन्यात, केपीच्या नौशेरा जिल्ह्यातील दारुल उलूम हक्कानिया मदरशावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात जेयूआय-एस नेते मौलाना हमीदुल हक हक्कानीसह सहा जणांचा मृत्यू झाला होता तर 15 जण जखमी झाले होते.
जानेवारी 2023 मध्ये पेशावरमधील पोलीस लाईन्स परिसरातील एका मशिदीत झालेल्या आत्मघाती स्फोटात 59 जणांचा मृत्यू आणि 157 हून अधिक जण जखमी झाले होते. या स्फोटात मशिदीच्या भिंती आणि छत उडून गेले होते. मार्च 2022 मध्ये पेशावरमधील कोचा रिसालदार येथील जामिया मशिदीत एक मोठा आत्मघाती स्फोट झाल्याने दहाहून अधिक जणांचा मृत्यू झाला. हल्लेखोराने प्रथम मशिदीबाहेर तैनात असलेल्या पोलिसांना ठार मारल्यानंतर आत जाऊन स्वत:ला उडवून देत आत्मघाती स्फोट घडवला होता.