पाकिस्तानात रमजानपूर्वी मशिदीत बॉम्बस्फोट, 5 ठार
मौलाना हक्कानीच्या मुलाची हत्या : शुक्रवारच्या नमाजदरम्यान आत्मघाती हल्ला
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
रमजान महिन्याला प्रारंभ होण्याच्या एक दिवस आधी पाकिस्तानातील जामिया हक्कानिया मशिदीत शुक्रवारी बॉम्बस्फोट झाला. ‘तालिबानच्या गॉडफादर’चा मुलगा हमीदुल हक हक्कानी याला लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. याशिवाय अन्य 4 जणांचा मृत्यू झाला आहे. सायंकाळपर्यंत कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नव्हती. या हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
खैबर पख्तूनख्वा प्रांतातील अकोरा खट्टक जिल्ह्यात आत्मघाती हल्ला झाल्याचे स्थानिक पोलीस अधिकारी अब्दुल रशीद यांनी सांगितले. बॉम्बस्फोटात अन्य 20 जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील अखोरा खट्टक येथील मदरशात शुक्रवारी नमाज पढताना झालेल्या आत्मघाती स्फोटात अनेक जण जखमी झाले. या हल्ल्यात जमियत उलेमा-ए-इस्लाम-सामीचे (जेयूआय-एस) प्रमुख मौलाना हमीदुल हक हक्कानी यांचाही मृत्यू झाला. तो जेयूआय-एसचे माजी प्रमुख आणि ‘तालिबानचे जनक’ मौलाना समीउल हक हक्कानी यांचा मुलगा होता. मौलाना हमीदुल हक हक्कानी हा नमाज पठणावेळी पहिल्या रांगेत उपस्थित होता. स्फोटानंतर लगेचच परिसरात गोंधळ उडाला.
हमीदुल हक्कानी हेच मुख्य लक्ष्य
या घटनेनंतर पेशावरमधील सर्व प्रमुख रुग्णालयांमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. सुरुवातीच्या तपासात हा आत्मघाती बॉम्बस्फोट असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये मशिदीच्या काही भागाचेही नुकसान झाले आहे. हा हल्ला मौलाना हमीदुल हक हक्कानी यांना लक्ष्य करून करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. मौलाना हमीदुल हक्कानी हा अफगाण तालिबानचा कट्टर समर्थक होता.